हमास दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे कोणतीही चाहूल न देता इस्रायलवर हजारो रॉकेट आणि शेकडो हल्लेखोरांसह हल्ला केल्यामुळे आखातात युद्ध पेटले आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अविव येथे जाणारी आणि तेथून येणाऱ्या सर्व विमान वाहतूकसेवा तूर्त रद्द केल्या आहेत.
‘७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतून तेल अविवला जाणारी एआय १३९ आणि तेल अविव ते दिल्ली येणारी एआय १४० ही परतीची विमानवाहतूक सेवा रद्द करण्यात आली आहे. आमचे प्रवासी आणि क्रू मेंबरच्या सुरक्षेसाठी आम्ही या विमानसेवा रद्द करत आहोत. प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार सर्वतोपरी साह्य केले जाईल,’ असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे.हमास दहशतवाद्यांनी गाझापट्टीकडून इस्रायलवर हजारो रॉकेटचा मारा केल्यामुळे एअर इंडियाने हवाईवाहतूक सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
सिक्किममध्ये पुरामधून वाहून आलेला तोफगोळा फुटला
भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण
इस्रायलच्या महिलेला हमासच्या अतिरेक्यांनी मारले; व्हीडिओमुळे संताप
‘डाव्या कट्टरवादाचे दोन वर्षांत उच्चाटन’
इस्रायलनेही युद्ध जाहीर केल्यामुळे इस्रायलच्या भारतीय दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांना सतर्क केले आहे. भारतीयांनी सतर्क राहावे आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन दूतावासातील अधिकाऱ्यांनी केले आहे.‘इस्रायलची सद्य परिस्थिती पाहता इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहण्याची विनंती केली जात आहे. तसेच, स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या सुरक्षेच्या सर्व नियमांचेही पालन करावे. कोणीही अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नये, प्रत्येकाने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा,’ असे आवाहन दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केले आहे.
पॅलिस्टिनी सैनिक आणि सुरक्षा दलाने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १००हून अधिक इस्रायली नागरिक ठार आणि ७४० जखमी झाल्याची माहिती आहे. तर, इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात १९८ पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू तर १६१०जण जखमी झाल्याचा दावा इस्रायलतर्फे करण्यात आला आहे.