जी २० परिषदेसाठी ‘एआय’आधारित कॅमेरे, स्नायपर्स

परदेशी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत सज्जता

जी २० परिषदेसाठी ‘एआय’आधारित कॅमेरे, स्नायपर्स

नवी दिल्लीतील जी २० शिखर परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नवी दिल्लीतील उंच इमारतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) वर आधारित अद्ययावत कॅमेरे तसेच, एनएसजी कमांडो आणि लष्करातील स्नायपर (दुर्बीण असलेल्या बंदुकीद्वारे वेध घेणारे) सज्ज राहणार आहेत.

 

नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार्‍या जी २० शिखर परिषदेच्या अगोदर दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दल आणि इतर तुकड्यांसह सुरक्षा यंत्रणांनी कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली आहे. समन्वय वाढवण्यासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्यक्रमाची ठिकाणांवर सुरक्षा यंणांकडून कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित यंत्रणेचा वापर केला जात आहे. संशयास्पद हालचाली झाल्यास या उपकरणांमधून अलार्म वाजून सुरक्षा यंत्रणेला सतर्क केले जाणार आहे.

 

एखादी व्यक्ती भिंतीवर चढताना किंवा धावताना किंवा खाली वाकणे यांसारख्या असामान्य हालचाली करताना आढळल्यास, ‘एआय’ कॅमेरे सुरक्षा कर्मचार्‍यांना ताबडतोब अलर्ट करतील. एनएसजीचे कमांडो आणि आर्मी स्निपरना जी २० शिखर परिषदेदरम्यान अतिरिक्त सुरक्षेसाठी उंच इमारतींमध्ये तैनात केले जाईल. अमेरिकेची सीआयए, ब्रिटनची एमआय-६ तसेच चीनच्या एमएसएस या गुप्तचर संघटनांनीदेखील सुरक्षाव्यवस्था चोख असल्याची खात्री केली आहे.

 

दिल्लीतील मुक्कामादरम्यान या देशांचे प्रमुख आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेची विस्तृत माहिती त्यांना पुरवली आहे. शिखर परिषदेच्या ठिकाणांच्या सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. यासाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराचे हेलिकॉप्टर दिल्लीच्या आकाशात डोळ्यांत तेल घालून गस्त घालतील. एनएसजी कोणत्याही संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणाही तैनात करेल. ‘व्हीआयपी’ सुरक्षेचा अनुभव असणाऱ्या सुमारे एक हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी ‘विशेष ५० टीम’ केंद्रीय राखीव पोलिस दलाने सज्ज केली आहे.

हे ही वाचा:

चीनच्या कुरापती सुरूच; अक्साई चीन परिसरात उभारले जात आहेत बंकर

कैदेत असलेल्या वाधवान बंधूंची शहराची सैर

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचे महत्त्व

लोकसभेच्या १६० कमकुवत जागा जिंकण्यासाठी अमित शहा सरसावले

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह परदेशातील मान्यवर नवी दिल्लीतील उच्चभ्रू हॉटेलमध्ये मुक्काम करतील. आयटीसी मौर्य हॉटेलच्या १४व्या मजल्यावरील प्रेसिडेन्शियल सूट अध्यक्ष जो बायडेन यांना दिला जाईल. शी जिनपिंग ताज पॅलेस हॉटेलमध्ये राहतील, तर पंतप्रधान ऋषी सुनक यांची शांग्रीला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे क्लेरिजेस हॉटेलमध्ये मुक्काम करतील आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज इम्पीरियल हॉटेलमध्ये राहतील. चीन आणि ब्राझीलचे प्रतिनिधी ताज पॅलेसमध्ये राहतील, तर इंडोनेशियन आणि ऑस्ट्रेलियन प्रतिनिधी इम्पीरियल हॉटेलमध्ये राहतील. ब्रिटन आणि जर्मनीच्या प्रतिनिधींची शांग्रीलात, तर इटली आणि सिंगापूरच्या प्रतिनिधींची हयात रेसिडेन्सी येथे निवासाची सोय करण्यात आली आहे.

Exit mobile version