बंगालच्या उपसागरावर वादळ निर्माण होण्याची शक्यता
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकताच तौक्ते वादळाचा मोठा तडाखा बसला. या तडाख्यातून पश्चिम किनारपट्टी पुरती सावरीलीही नसताना आता पुर्वेला देखील एका वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २३ मे पर्यंत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचे रुपांतर वादळात होऊ शकते.
भारतीय हवामान खात्यात वादळांवर काम करणाऱ्या सुनिता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत केवळ माहितीपत्रक जारी करण्यात आले आहे, परंतु या वादळाचे भाकित अधिक माहिती प्राप्त झाल्यानंतरच करण्यात येईल.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरील वातावरणीय आणि सामुद्री परिस्थिती अरबी समुद्रावरील वादळ निर्माण होण्यासाठी अनुकूल असलेल्या वादळाप्रमाणे झाल्या आहेत. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान ३१ अंश सेल्सियसच्या जवळपास आहे, जे सामान्य सरासरी तापमानापेक्षा १-२ अंश अधिक आहे.
हे ही वाचा:
दहा कंपन्यांना लस बनवण्याचे लायसन्स द्या
‘लस- पर्यटनात’ भारतीयांची रशियाला पसंती
सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोहही करू शकते
मराठा आरक्षण: भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटून बाजू मांडावी
भारतीय हवामान खात्यासोबत, हवामानाचे अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या संस्थेने देखील वादळाची शक्यता वर्तवली आहे. परंतु त्यांच्यामते जरी हे वादळ निर्माण झाले तरी ते भारतीय किनारपट्टीकडे न सरकता म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता अधिक आहे.
जर भाकित केल्याप्रमाणे खरोखरच वादळाची निर्मिती झाली, तर त्या वादळाचे नाव ओमानकडून सुचवण्यात आलेले ‘यास’ असे ठेवण्यात येईल.
दरम्यान पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढणाऱ्या तौक्ते वादळाची ताकद लँडफॉलनंतर लक्षणीयरित्या घटली आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर धडकताना वादळातील वाऱ्याचा वेग १६० किमी ते १९० किमी इतका प्रचंड होता. आता या वादळाचा सामना पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम हिमालय आणि त्यालगतच्या मैदानी प्रदेशावर गडगडटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, चंदिगढ़, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यांत १९ मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.