सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसनंतर पतंजलीकडून भविष्यात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती न करण्याचे आश्वासन

पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी खेद व्यक्त करत स्पष्ट केली भूमिका

सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसनंतर पतंजलीकडून भविष्यात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती न करण्याचे आश्वासन

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून अवमानाची नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.यानंतर पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कंपनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी खेद व्यक्त करत आहे. तसेच त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही भविष्यात अशा जाहिराती जारी होणार नाहीत याची खात्री करू.

‘पतंजली’ आयुर्वेद जाहिराती करून खोटे दावे करत आहे आणि दिशाभूल करण्याचे काम करत आहे, असा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) पतंजली विरोधात याचिका दाखल केली होती. यावरून न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अमानुल्ला यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेत बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना अवमानाची नोटीस बजावली होती. तसेच पुढील दोन आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या नोटीसनंतर व्यवस्थापकीय संचालकांचे हे विधान आले आहे.

२७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांवरील औषधांच्या जाहिराती प्रकाशित करण्यापासून रोखले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये, कंपनीने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले होते की, ते वैद्यकीय कार्यक्षमतेबद्दल किंवा औषध प्रणालीवर टीका करण्याबद्दल कोणतेही विधान किंवा अप्रमाणित दावे करणार नाही. मात्र, कंपनीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरूच ठेवल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्रात, आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, नोव्हेंबर २०२३ नंतर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये फक्त सामान्य विधाने होती परंतु, त्यात आक्षेपार्ह वाक्ये असल्याचे लक्षात आले होते. नोव्हेंबर २०२३ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नसलेल्या पतंजलीच्या मीडिया विभागाने जाहिरातींना मंजुरी दिली होती.

हे ही वाचा:

जर पुन्हा औरंगजेबाशी तुलना कराल तर अन्य दोन कबरी खोदाव्या लागतील!

आरोपी साजिदची आई म्हणाली, एन्काउंटरमध्ये मुलाच्या मृत्यूचे दु:ख नाही!

नेमकं काय भोवलं ? राजकीय असंग की मनसुखच्या पत्नीचे शाप?

तुम्ही उतरलात तरी घडायचे तेच घडणार !

तसेच न्यायालयाने म्हटले की, या अगोदर न्यायालयाने जाहिरातींवरून पतंजलीवर रोख लावण्यात आली होती. तरीही त्यांनी जाहिराती केल्या. आदेशानंतरही अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत ज्यात पतंजलीची औषधे इतर औषधांपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून पतंजली सातत्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पतंजलीच्या आयुर्वेदाच्या जाहिराती प्रकरणी न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून उत्तर मागितले होते. त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्यांना न्यायलयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.

Exit mobile version