गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाईटच्या वापरामुळे तरुणांच्या डोळ्यावर गंभीर परिणाम होत असल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे धुळ्यात डीजेच्या आवाजाने पोलिसांना कानाचा त्रास होत असल्याच्या घटना घडत असल्याची बाब समोर आली आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांना कर्कश आवाजामुळे कानाचा त्रास सहन करावा लागला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजामुळे १५ पोलिसांना कर्णदोष झाल्याची माहिती आहे. विसर्जन मिरवणुकीनंतर हा आजार लक्षात आला असून या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळ्यात गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताला असणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांना कानाचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. गणेश विसर्जनानंतर अनेकांना कानांचा आणि डोळ्यांचा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. यात पोलिसांचा समावेश आहे. आवाज मर्यादा ओलांडल्याने अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे नागरिकांनी डीजे पासून शंभर फूट अंतरावर दूर राहावे तसेच प्रशासनाने देखील डीजे वर बंदी आणावी अशी मागणी कर्ण रोग तज्ञ डॉक्टर संजय देवरे यांनी केली आहे.
अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव मिरवणूक मोठ्या आनंदात पार पडली. गणपतीला भक्तांनी आनंदात विसर्जित केलं. यावेळी यामध्ये ढोल ताशासह डीजेचा वापर जास्त दिसून आला. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला.
हे ही वाचा:
काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळे दाखवण्यासाठी रेटला अजेंडा
हळद निर्यातीत १०० कोटी डॉलरचे लक्ष्य गाठण्यासाठी हळद मंडळाची स्थापना
नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
काही दिवसांपूर्वी काही तरुण दृष्टिदोषाची तक्रार घेऊन नेत्र तज्ञांकडे आले होते. त्यांची नजर क्षीण झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले. त्यानंतर त्यांचे नेत्रपटल तपासण्यात आल्यावर तेथे रक्त साकळल्याचे लक्षात आले. या रुग्णांच्या डोळ्यांना ना मार लागला होता, ना त्यांनी वेल्डिंग बघितले होते. मात्र, गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर शोसमोर नाचल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे लेझरमुळेच त्यांना डोळ्याला दुखापत झाल्याचे समोर आले.