मुंबईतील कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने बाजार परिसरात शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर जवळपास ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास सध्या सुरू असून बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, बुद्ध कॉलनी येथे सोमवारी रात्री अपघात झाल्याने पोलीसांनी कुर्ला स्टेशन बंद ठेवले आहे. त्यामुळे या भागातील काही बेस्ट बसेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. बसमार्ग ३७, ३२०, ३१९, ३२५, ३३०, ३६५ आणि ४४६ या बसेस कुर्ला आगारातून चालणार आहेत. तसेच सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन या मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या बस ३११, ३१३ आणि ३१८ या बसेस टिळक नगर पुल येथून यु टर्न घेऊन कुर्ला स्टेशनला न जाता सांताक्रुझ स्टेशनला जातील. बसमार्ग ३१० च्या बसेसही टिळक नगर पुल येथून यु टर्न घेऊन बांद्रा बस स्थानक येथे जातील.
दरम्यान, या अपघातातील जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून यासदंर्भात माहिती समोर आली आहे. भाभा रुग्णालयात ३५ रुग्णांची नोंद झाली होती. यातील दोन रुग्ण रुग्णालयात आणण्यापूर्वी मृत झाले होते तर दोन रुग्णांचा रुग्णालयात आणल्यानंतर मृत्यू झाला. कोहिनूर रुग्णालयात तीन रुग्णांची नोंद असून यातील एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयात चार पोलिसांची नोंद असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हबीब रुग्णालयात आहा रुग्णांची नोंद असून यातील एकाचा मृत्यू झाला असून इतर पाच जणांवर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
लालूप्रसाद यादव म्हणतात, ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममतांना द्या
श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेले २१ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले
नागरी हक्कांसाठी सहाय्यक ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय-अमेरिकन हरमीत धिल्लन कोण आहेत?
बेस्टची ३३२ क्रमांकाची कुर्ला रेल्वे स्टेशन ते अंधेरी स्थानक या मार्गावरील ही बस होती. रात्री ९.२० वाजता कुर्ला रेल्वे स्टेशन वरून बस निघाली. न्यू मॉडेल टॉकीज येथे पोहोचल्यावर भरधाव वेगात ही बस समोरील वाहनांना धडकत काही अंतरावर गेली. आंबेडकर नगर चौक येथील कमानील बस धडकल्यानंतर थांबली. या बसच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अपघातामागील कारणे शोधली जात आहेत.