इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. नीतीशकुमार यांच्यानंतर तृणमूल काँग्रेस स्वतः या विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडण्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सातत्याने काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर टीका करत असल्याच्या पार्श्वभूमीवर डाव्या पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर डाव्या पक्षांनी हा दावा केला.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ पश्चिम बंगालला पोहोचली आहे. गुरुवारी डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झाले होते. माकपचे प्रदेश सचिव मोहम्मद सलिम यांनी पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती आणि अन्य नेत्यांसह रघुनाथगंज येथे राहुल गांधी यांची भेट घेतली. या यात्रेप्रति आमची एकजूटता दाखवण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे त्यांनी सांगितले. सलीम यांनी गांधी यांच्यासोबत सुमारे ४५ मिनिटे चर्चा केली.
हे ही वाचा:
झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकार!
अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!
अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे हिचे कर्करोगाने निधन
वर्षभरात काही सिद्ध न झाल्यास जप्त केली मालमत्ता परत करा!
त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीपासून स्वतःला दूर ठेवण्यास उत्सुक असल्याचे विधान केले. ‘सुरुवातीपासूनच अनेक जण या आघाडीत सहभागी झाले. मात्र भाजपविरोधी लढाईचा भाग कोण राहील आणि कोण स्वतःला त्यापासून वेगळे ठेवेल, हे कोणीही सांगू शकत नाही. ममता बॅनर्जी आता स्वतःहून आघाडीपासून वेगळे राहू इच्छित आहेत आणि आम्ही या निर्णयासाठी त्यांचे स्वागत करतो,’ असे सलीम म्हणाले.
तृणमूल प्रमुखांनी नुकताच असा आरोप केला होता की, माकप विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अजेंड्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र सलीम यांनी तो आरोप फेटाळून लावला. ‘काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. माकपकडे एवढी ताकद आहे का? तरीही ते असे म्हणत आहेत की, माकप काँग्रेसला नियंत्रित करत आहे,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.