नीतिश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत भारतीय जनता पक्षाचा हात धरण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यामुळे बिहारमधीलच नव्हे तर देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. बिहारमधील राजकारण तर या निर्णयामुळे बदलणार आहेच पण देशातील राजकारणावर आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे बदल दिसणार आहेत ते महत्त्वाचे असतील. खरेतर नीतिश कुमार यांना या निर्णयानंतर आणि सलग नवव्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर टीका सहन करावी लागत आहे ती पलटी मारणारे नेते म्हणून. पण नीतिश कुमार यांनी असे निर्णय घेताना भविष्यातील राजकारणाचा विचार केला असला पाहिजे.
आगामी काळात नरेंद्र मोदी हेच लोकसभा निवडणुकीत बाजी मारणार हे भलेही विरोधक कबुल करत नसले तरी जनतेचा रोख कुठे आहे, देशातील राजकारणाची हवा कुठे चालली आहे, हे ओळखण्याइतपत नीतिशकुमार यांचे राजकारण प्रगल्भ आहे. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदींनाच यावेळीही जनता मतांचा कौल देणार हे लक्षात घेऊन वेळीच एनडीएमध्ये उडी मारली आहे. याला निमित्त झाले ते त्यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याची लालू प्रसाद यादव यांच्याकडून झालेली मागणी. त्यातच लालूंची मुलगी ऱोहिणी आचार्य यांनी केलेले ट्विट. त्यांनी नीतिश कुमार यांच्यावर या ट्विटमधून टीका केली होती. हे निमित्त नीतिश कुमार यांना पुरेसे होते. त्यांनी लागलीच एनडीएच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली. तसेही आधी जी-२० परिषदेच्या वेळी नीतिश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते.
त्यावेळची त्यांची देहबोली पुरेशी बोलकी होती. अगदी हसतखेळत ही भेट झाली होती. तेव्हाच नीतिश कुमार यांनी राजकारणाची हवा ओळखली होती, असे म्हणता येईल. शिवाय, इंडी आघाडीतील ते एक सदस्य असले तरी ते या आघाडीत कधीही एकजीव झाल्याचे दिसले नाही. त्यांच्याबद्दल कुणीही कधी विश्वास दाखविल्याचे आढळले नाही. त्यांचे नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे येऊ लागले तेव्हा त्याबद्दल कुणीही एकमताने त्याला होकार दिला नाही. उलट कधी ममता बॅनर्जी, कधी मल्लिकार्जुन खर्गे, कधी राहुल गांधी अशीच नावे पुढे येत राहिली. इंडी आघाडीचा समन्वयक म्हणूनही त्यांचे नाव पुढे येत असताना खर्गे यांच्या नावालाच पसंती दिली गेली. परिणामी, नीतिश कुमार यांचे इंडी आघाडीशी कधीही जुळले नाही.
आता नीतिश यांच्या या निर्णयामुळे इंडी आघाडीला मोठा धक्का बसणार आहेच. कारण तसेही पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत निवडणूक लढविणार नाही हे स्पष्ट केले आहे तर पंजाबमध्येही आम आदमी पार्टीने काँग्रेसला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तिथेही आपण स्वबळावर निवडणूक लढविणार असे आपने स्पष्ट केले. तामिळनाडूमधील डीएमकेचे मंत्री आणि नेते कन्नप्पन यांनी तर काँग्रेसला त्यांची जागा दाखविली. केवळ मते मिळविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरते असा आरोप त्यांनी केला होता. या सगळ्या परिस्थितीत इंडी आघाडीचे काय होणार हे पुरेसे स्पष्टच होते. त्यात आता नीतिश कुमार यांनीच आपले स्थान बदलले आहे. त्यामुळे इंडी आघाडीचे भवितव्य आता पूर्णतः टांगणीला लागले आहे.
हे ही वाचा:
येत्या आठवड्यात देशात CAA लागू होईल, ही माझी गॅरंटी!
भगव्या झेंड्यावरुन कर्नाटकात काँग्रेस-भाजप आमनेसामने!
तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल!
मालदीवच्या संसदेत तुफान हाणामारी!
इकडे महाराष्ट्रातही या निर्णयाचे परिणाम जाणवणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी असली तरी त्यातील सगळे पक्ष हे इंडी आघाडीचे सदस्य आहेत. तिथे मात्र अद्याप उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र आहेत असा दावा केला जात आहे. पण इंडी आघाडीत काँग्रेसची जशी ना घर का ना घाट का अशी स्थिती आहे, तशी महाराष्ट्रात नाही. उलट तिथे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापेक्षा वरचढ आहे. मध्यंतरी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे असलेल्या ताकदीविषयी शंका उपस्थित केली होती. ते खरेही आहे.
दोन्ही पक्ष आता गलितगात्र झालेले आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या आधाराची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी तर मिळतील त्या छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेतले आहे. त्यात संभाजी ब्रिगेडसह वंचित बहुजन आघाडीलाही त्यांना सोबत घ्यावे लागले आहे. पण सोबत काँग्रेसही लागणार आहे. मात्र काँग्रेसला या पक्षांची ही हतबलता ठाऊक असल्यामुळे ते लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात त्यांना वाटेल तेवढ्या जागा इथे ऑफर करतील. तेव्हा इंडी आघाडीत मोठी फाटाफूट असली तरी महाराष्ट्रात मात्र काँग्रेसला अच्छे दिन आहेत. बुडत्याला काडीचा आधार या अर्थाने हे दोन्ही पक्ष काँग्रेसला धरून वाटचाल करू इच्छित असतील. अर्थात, काँग्रेसलाही स्वतंत्रपणे निवडणुका लढवून आपले अस्तित्व शाबूत ठेवायचे आहे. त्यामुळे इंडी आघाडीतील सदस्य एकेक करून बाजुला होत असतील तर ते त्यांना हवेच असले पाहिजे. महाराष्ट्रात आता काय होणार याची त्यामुळेच उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांची नावे यापूर्वी पंतप्रधान म्हणून अनेकवेळा घेतली गेली आहेत. पण आता त्यांना अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. नीतिशकुमार यांच्या निर्णयामुळे इंडी आघाडी फुटली असली तरी उद्धव ठाकरे, शरद पवार हे मात्र इंडी आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार नाहीत असेच दिसते.