ठाण्यात आधीच वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झालेले असताना त्यांच्या या त्रासात आणखी भर पडणार आहे. आता शहराच्या अंतर्गत भागातही रहदारीच्या कोंडीमुळे रहिवाशांचा अंत पाहिला जात आहे.
बुधवारपासून घोडबंदर मार्गावर एमएमआरडीएने मेट्रोचे खांब उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. हे काम मध्यरात्रीपासून सुरू होणार असल्यामुळे ४ ते ९ ऑगस्ट या दिवसांत रात्री ११ ते पाहटे ५ या वेळेत घोडबंदरच्या दिशेने येणारी अवजड वाहनांची वाहतूक कापूरबावडीहून भिवंडीतील कशेळी- काल्हेर किंवा माजीवाडा येथून खारेगाव टोलनाका मार्गे वळविण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा परिणाम या दोन्ही मार्गांवर होण्याची शक्यता आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे ठाणे वाहतूक शाखेने ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला शिळफाटा येथे प्रवेश बंद करून ती वाहतूक महापे, कोपरखैरणे पुलाखालून, रबाळे, ऐरोली, आनंदनगर, कोपरी रेल्वे पूलमार्गे ठाण्यात वळवली आहे. मुलुंड येथील टोलनाका चुकवण्यासाठी काही ट्रक चालकांनी पटनी येथे प्रवेश करून कळवा, विटावा मार्गे ठाण्यातून घोडबंदरच्या किंवा खारेगावच्या दिशेने प्रवास सुरू केल्यामुळे शहरातील अंतर्गत भागातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
मुंब्रा बाह्यवळणाला पर्यायी मार्ग म्हणून गुजरातकडे जाणारे कंटेनर हे कोपरी येथील मार्गाचा वापर करत आहेत. कोपरी पुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन येथेही मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते.
हे ही वाचा:
आता ‘रवी’ कडून अपेक्षा ‘सुवर्ण’ किरणांची
कांस्य पदक विजेत्या लोवलिनाचे पंतप्रधानांकडून कौतूक
इम्रान खानवर आली घर भाड्याने देण्याची वेळ
ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ठिकठिकाणी सुरू असलेली मेट्रोची कामे आणि मुंब्रा बाह्यवळणावरील बंद असलेली अवजड वाहनांची वाहतूक यातून मार्ग काढताना वाहतूक पोलिसांची दमछाक होताना दिसत आहे. मुंब्रा बाह्यवळणाचा खड्डा बुजवण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. खड्ड्यांमधून मार्ग काढताना आणि वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने ठाणेकरांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला दिसून येत आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील कामे पूर्ण होण्यास निश्चित किती वेळ लागेल याची कल्पना सार्वजनिक विभागाचे अभियंते देत नाहीत, त्यामुळे पोलिसांना वारंवार अधिसूचना काढावी लागते. खारेगाव टोलनाका येथील खड्डे दोन वेळा बुजवले होते; परंतु पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडतात. त्यामुळे ठाणे शहरात वाहतूक कोंडी होत आहे अशी प्रतिक्रिया ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.