इर्शाळवाडी दुर्घटनेत पोरक्या झालेल्या मुलांना हवाय भावनिक आधार

मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आवश्यकता

इर्शाळवाडी दुर्घटनेत पोरक्या झालेल्या मुलांना हवाय भावनिक आधार

इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक घटनांमध्ये तर घरातील एकमेव मूल वाचले आहे. या दुर्घटनेच्या वेळी शासकीय निवासी शाळेत शिकत असल्यामुळे अनेक मुलांचा जीव वाचला. या दुर्घटनेत एकूण २२ जण अनाथ झाल्याचे उघड झाले आहे. त्यातील १८ मुले तर अल्पवयीन आहेत. त्यातील काही मुले तीन वर्षांची आहेत, तर १८ ते २० वयोगटातील चौघांचा समावेश आहे. ही चारही मुले पनवेल, कर्जत, खालापूर येथील सरकारच्या आदिवासी विभागाद्वारे चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेत राहात होती. तर, एकाचे अद्याप शालेय शिक्षण सुरूही झालेले नाही.

 

मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, त्यापैकी बहुतेकांची प्रकृती नाजूक आहे आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अचानक कोसळलेल्या या संकटाने ती हादरली असून भावनिकदृष्ट्यादेखील कमजोर झाली आहेत. त्यामुळे ही मुले तीव्र नैराश्याला बळी पडू शकतात. त्यापैकी काही जण या गावकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्ये आश्रयाला आहेत. तर, काही त्यांच्या नातेवाइकांकडे राहायला गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे राज्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

 

सन २०२१मध्ये महाड येथे झालेल्या दुर्घटनेतून वाचलेल्या विशेषत: अनाथ झालेल्या मुलांचे समुपदेशन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी केले होते. इर्शाळवाडीतील मुलांनाही अशा प्रकारे समुपदेशनाची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘या मुलांना प्राथमिक मानसिक उपचाराचा भाग म्हणून समुपदेशन करावे लागेल. या दुर्घटनेमुळे त्यांना रात्री भीती वाटणे, कमी झोप येणे, एकटेपणा वाटणे यांसारखे ‘पोस्ट-ट्रॉमॉटिक स्ट्रेस डिसॉर्डर’ होऊ शकतात. आश्रमशाळांत राहणाऱ्या या मुलांचे कुटुंबच अस्तित्वात नाही. अशा मुलांना या आजारांचा अधिक धोका आहे. त्यामुळे त्यांना किमान वर्षभर तरी समुपदेशन करावे लागेल,’ असे डॉ. भुसारे यांनी सांगितले.

 

अन्य मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वरुण घिडियाल यांनीही यावर प्रकाशझोत टाकला. ‘मुलांचे मानसिक आरोग्य नातेसंबंधांवर आधारित असते. ही मुले राग, नकार, नैराश्य आणि स्वीकृती या टप्प्यांतून जात असतात. बाल मानसोपचारतज्ज्ञांनी दर आठवड्याला त्यांचे समुपदेशन केले पाहिजे, जेणेकरून ही मुले त्यांच्या भावना व्यक्त करू शकतील. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाय योजले पाहिजेत,’ असेही डॉ. घिडियाल त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

पंतप्रधानांचा घणाघात; इस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीननेही ‘इंडिया’ शब्द वापरला!

टँकरमधून आरडीएक्स नेत असल्याचा खोटा फोन करणारा अटकेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, दुसरे कुणीही नाही!

 

‘काहीजण त्यांच्या दु:खातून बाहेर पडतात, काहीजण आपले आयुष्य जगू लागतात. मात्र काही जणांना या परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे ती व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गावर जातात. त्यांच्या विचारांना योग्य दिशा दिली पाहिजे. अनेक देशांमध्ये अशा सामाजिक-आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या कुटुंबातील मुलांचे अभ्यासात फारसे लक्ष नसल्याने ती विविध खेळांकडे वळल्याचे आढळून आले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत ‘अनाथांसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा प्रशासन घेईल,’ असे खालापूरचे तहसीलदार अयुब तांबोळी यांनी सांगितले.

Exit mobile version