दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता अहमदाबादमधील अनेक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील आठ शाळांना धमकीचे ईमेल मिळाले आहेत.अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना, शाळेत बॉम्बची धमकी मिळाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.
गुजरातमध्ये उद्या (७ मे) तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील विविध शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.पोलीस धमकीच्या मेलची चौकशी करत आहेत.रशियन मेल आयडीवरून ही धमकी देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या ईमेलनंतर पोलीस सतर्क झाले असून शाळांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे.
हे ही वाचा:
‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेवरून सागरी प्राण्याला मिळाली नवी ओळख!
गडचिरोली पोलिसांकडून कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी, ३ क्लेमोर स्फोटके नष्ट
‘टी -२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट’
मिळालेल्या माहितीनुसार, घाटलोडिया येथील आनंद निकेतन आणि चांदखेडा येथील केंद्रीय विद्यालय,शाहीबाग येथील आर्मी कॅन्टोन्मेंट शाळेला धमकीचे ईमेल आले आहेत. बॉम्बच्या धमकीनंतर पोलिस आणि बीडीडीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे.बॉम्ब निकामी पथकही शोध घेत आहे.सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
पीएसआय बॉम्ब निकामी पथकाचे अधिकारी बी यादव यांनी सांगितले की, अहमदाबादच्या शाळांमध्ये आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून घाबरण्याचे कारण नाही. अनेक शाळांमध्ये शोधमोहीम पूर्ण झाली आहे. पोलीस सतर्कतेवर काम करत आहेत.