भारतीय संघाने सुरुवातीला बसलेल्या धक्क्यातून सावरत सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेच्या दमदार भागिदारीच्या जोरावर अमेरिकेचा टी २० विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात सात विकेटने पराभव केला आणि सुपर आठमध्ये धडक दिली.
अमेरिकेने पहिल्यांदा फलंदाजी करून २० षटकांत आठ विकेट गमावून ११० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सौरभ नेत्रवलकरने भारताला सुरुवातीलाच धक्के दिले.
सौरभने विराट कोहली आणि रोहित शर्माला बाद केले. मात्र सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक ठोकून भारताला अवघड परिस्थितीतून बाहेर काढले. तर, दुसऱ्या बाजूला शिवम दुबेने किल्ला लढवला. या दोन फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने १८.२ षटकांतच अमेरिकेवर तीन विकेट गमावून १११ धावा करून विजय नोंदवला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय आहे आणि भारताने सहा गुण घेऊन सुपर आठमध्ये जागा पक्की केली आहे.
याआधी भारताने नाणेफेक जिंकून अमेरिकेला फलंदाजीचे आमंत्रण दिले. जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग याने पहिल्याच षटकात अमेरिकेला दोन धक्के दिले. त्यातून अमेरिका शेवटपर्यंत सावरू शकली नाही. अमेरिकेकडून नीतीश कुमार याने सर्वाधिक २७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही चांगली झाली नाही. भारताने विराट कोहलीच्या रूपात पहिली विकेट गमावली. विराट खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर सौरभने भारतीय कर्णधार रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला.
हे ही वाचा:
हिंदू यात्रेकरूंवरील हल्लाप्रकरणी विहिंप, बजरंग दल आक्रमक!
इटलीत खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना!
मुख्यमंत्री महोदय, वक्फ बोर्डाला १० कोटी देऊन मतं मिळतील का?
मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री!
एका क्षणी भारतीय संघ अवघड परिस्थितीत होता. मात्र सूर्यकुमार आणि शिवम यांनी भारताची बाजू सांभाळली आणि विजय नोंदवला. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूंत चार चौकार व सहा षटकारांसह ५० धावा आणि शिवम दुबेने ३५ चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. तत्पूर्वी ऋषभ पंतने २० चेंडूंत १८ धावा केल्या. अर्शदीप सिंगने चार षटकांत केवळ नऊ धावा देऊन चार विकेट घेतल्या.