देशात कोविडची लाट पसरत असतानाच आता त्यात नव्या चिंतेची भर पडली आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या अनेक रुग्णांना म्युकोरमायकोसिस या रोगाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रुग्णांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढल्याने भविष्यात म्युकोरमायकोसिसची साथ येईल की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.
सध्या उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे अनेक रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापासूनच दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही औषधेही प्रचंड महाग आहेत. त्यामुळे म्युकोरमायकोसिसचा वाढता संसर्ग राज्यासाठी नव्या संकटाची चाहुल मानली जात आहे.
काय आहे म्युकोरमायकोसिस?
म्युकोरमायकोसिस हा बुरशीपासून पसरणारा आजार आहे. एरवी आपली रोगप्रतिकाकक्षमता उत्तम असताना बुरशीचे आजार त्रासदायक ठरत नाहीत. परंतु कोविडसारख्या आजारानंतर, रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असताना, या आजाराचा धोका संभवतो.
हे ही वाचा:
जाणत्या-अजाणत्यांचे बार बार देखो
मराठा आरक्षणासाठी नाही, बार मालकांसाठी पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
दिल्लीत १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स काळ्याबाजारातून जप्त
मुंबईतल्या निवासी डॉक्टर्सची महापालिकेकडून लूट?
हा बुरशीपासून होणारा हा संसर्ग शरीरात कुठे झाला आहे त्यावर या रोगाची प्राणघातकता ठरते. मात्र मेंदू आणि फुप्फुसांत होणारा संसर्ग अतिशय प्राणघातक ठरतो. या आजाराची प्राणघातकता अशा वेळेस ९८ टक्क्यांपर्यंत वाढतो, आणि दुर्दैवाने साधारणपणे ५० टक्के लोकांमध्ये हा आजार मेंदू आणि फुप्फुसांपर्यंत पोहोचू शकतो.
म्युकोरमायकोसिस कसा ओळखावा?
म्युकोरमायकोसिसमुळे डोकेदुखी, चेहऱ्याची एकच बाजू सुजणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सुज येणं यासारखी गंभीर लक्षणे आढळू शकतात. त्याबरोबरच नाकापाशी जाड काळ्या रंगाचा ठिपका देखील सुरूवातीच्या काळात आढळू शकतो. हा आजार झाल्यानंतर उपचारासाठी फार कमी कालावधी उपलब्ध असतो. त्यामुळे अधिक वेळ वाया न घालवता डॉक्टरांकडे जाणे उत्तम! या आजाराच्या संसर्गाला नाकापासून सुरुवात होते. त्यानंतर हा संसर्ग तोंडाचा जबडा आणि मेंदूपर्यंत पसरत जातो.
म्युकोरमायकोसिस होऊ नये यासाठी काय करता येईल?
म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असल्याने उत्तम रोगप्रतिकारकशक्ती असेल तर यापासून धोका संभवत नाही. त्यामुळे नियमित आहार, पुरेशी झोप, व्यायाम या गोष्टी सातत्याने चालू ठेवाव्यात. त्याबरोबरच नियमितपणे हात धुणे, चेहऱ्याला वारंवार स्पर्श न करणे, थोडक्यात कोविड होऊ नये यासाठी जे सामान्य संकेत पाळतो त्यांचे पालन केल्यास दोन्ही आजारांपासून दूर राहता येईल.
राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज
सध्याच्या घडीला मुंबईच्या परळ येथे म्युकोरमायकोसिसवर उपचार होणारे एकमेव स्पेशालिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात म्युकोरमायकोसिसच्या ३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी २५ जण हे मुंबईबाहेरील आहेत. याचा अर्थ राज्यात म्युकोरमायकोसिसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने वेगाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्लोबल रुग्णालयातील डॉ. मिलिंद नवलाखे यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयातदेखील सध्याच्या घडीला म्युकोरमायकोसिसचे २५ रुग्ण आहेत. बहुतशांत रुग्ण हे मुंबईबाहेरील असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. म्युकोरमायकोसिसच्या हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या हातात उपचार करण्यासारखे फार काही उरत नाही, असे डॉ. हेतल मारफातिया यांनी म्हटले.
…तर म्युकोरमायकोसिस कोरोनापेक्षा भयंकर ठरेल
डॉ. संजीव झांबाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मी दिवसाला म्युकोरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण सापडताना बघत आहे. हे प्रमाण वाढल्यास त्यांच्यावर उपचार कसे करायचे, ही समस्या असेल. कारण अँटी-फंगल रोगांवरील औषधांचा केवळ तुटवडाच नाही तर ही औषधेही प्रचंड महाग असल्याचे डॉ. झांबाने यांनी सांगितले.