शुक्रवार, १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जिल्ह्यात, शहरांत, नाक्यानाक्यावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांनी कोरोना निर्बंधांनंतर दहीहंडी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. राज्यभरात या सणाचा उत्साह दिसून येत आहे. नागरिक, गोविंदा पथकांनी यंदा मोठ्या जल्लोषात दहीहंडीला उपस्थिती दाखवली आहे.
गेली दोन वर्षे संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सणांच्या वेळी निर्बंधांमुळे नागरिकांना उत्साहात सन साजरे करता येत नव्हते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आणि शिंदे- फडणवीस सरकारने सर्वच निर्बंधांमधून नागरिकांची मुक्तता केल्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सवात वेगळाच उत्साह दिसून येत आहे. तब्बल दोन वर्षांनी कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यामुळे निर्बंधमुक्त वातावरणात गोविंदा देखील मोकळा श्वास घेत आहेत.
मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा जल्लोष दिसून येत असून ठाण्यातही दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. तर गोविंद पथकांचा जोश वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोविंदांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा जखमी झाल्यास राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे
जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयात होणार मोफत उपचार
तसेच गोविंदांची मागणी होती की या उत्सवाचा साहसी खेळ म्हणून समावेश व्हावा. त्यानंतर या मागणीचा विचार करता गोविंदा उत्सवाचा क्रीडाप्रकारात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दहीहंडी दरम्यान एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर शासनाकडून १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोविंदा गंभीर जखमी झाला तर ७.५० लाख आणि त्याच्या अवयवाला गंभीर इजा झाली तर ५ लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.