४५ वर्षांनंतर यमुना नदीने विक्रमी पाणीपातळी गाठली

नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने दिल्लीत पूरस्थिती

४५ वर्षांनंतर यमुना नदीने विक्रमी पाणीपातळी गाठली

उत्तर भारतात पावसाने हाहाःकार माजवला असून उत्तरेकडील राज्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, येत्या २४ तासांत उत्तर भारतातील काही राज्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने आणखी चिंता व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आदी राज्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या राज्यांमधील नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक रस्ते, पूल वाहून गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे.

यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी

दिल्लीत यमुना नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने राज्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील सखल भाग पुराच्या पाण्यात बुडाला आहे. त्याचबरोबर रहिवासी भागातही पाणी तुंबले असून, रस्त्यांवर पाणी साचण्याची स्थिती आहे. शहरातील सर्व बाजारपेठांमध्येही पाणी तुंबले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत १९७८ नंतर ४५ वर्षांत प्रथमच यमुना नदीने विक्रमी पाणीपातळी गाठली आहे. बुधवार, १२ जुलै रोजी दुपारी १ वाजता दिल्लीतील यमुनेची पातळी २०७.५५ मीटरवर पोहोचली आहे. धोक्याच्या चिन्हाच्या वर ही पातळी आहे. याआधी १९७८ मध्ये यमुनेची कमाल पातळी २०७.४९ मीटर होती. त्यावेळी दिल्लीत पूर आला होता आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेशात १० हजारांहून अधिक पर्यटक अडकले

पश्चिम बंगाल निवडणुकीत उमेदवारांचे कारनामे; मतपत्रिका चावल्या; तलावात उडी

आणखी एका चित्त्याचा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात मृत्यू

उद्धव ठाकरेंनी लोकांना वेळ दिला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव

मुख्यमंत्री केजरीवाल यांचे अमित शहांना पत्र

केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार, यमुनेची पातळी रात्री २०७.७२ मीटरपर्यंत पोहोचेल, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडला नाही. दिल्लीतील पावसामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढत नसून, हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे ती वाढत आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच शक्य असल्यास हथिनीकुंड बॅरेजचे पाणी मर्यादित वेगाने सोडावे जेणेकरून दिल्लीतील यमुनेची पातळी आणखी वाढणार नाही, असेही ते म्हणाले. अशा आशयाचे त्यांनी पत्र लिहिले आहे. तसेच दिल्लीत होणाऱ्या जी- २० परिषदेचा हवाला दते म्हटले की दिल्ली ही देशाची राजधानी आहे. आणि काही आठवड्यात येथे जी- २० शिखर परिषद होणार आहे. देशाच्या राजधानीत आलेल्या पुराच्या बातम्यांनी जगाला चांगला संदेश जाणार नाही. आपण सर्वांनी मिळून दिल्लीच्या जनतेला या परिस्थितीतून वाचवायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version