मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलिस हवालदारावर सुमारे २४ वर्षांपूर्वी २०० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता. तेव्हा हे प्रकरण स्थानिक न्यायालयात पोहोचले आणि न्यायालयाने त्याला लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यावेळी त्या हवालदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात 200 रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण तब्बल चोवीस वर्षे चालले. या २४ वर्षात न्यायालय, हवालदाराने लाच घेतल्याचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे.
नागनाथ चवरे असे या पोलीस हवलदाराचे नाव होते. त्यांनी लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर ३१ मार्च १९९८ गुन्हा दाखल केला होता. चवरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ अन्वये सार्वजनिक सेवकाचे गुन्हेगारी गैरवर्तन आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर अडीच वर्षांची शिक्षा देखील त्यांना झाली होती. काही वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. आता त्यांची पत्नी आणि मुलगा जिवंत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे अपील मान्य केले आणि अखेर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने ३१ मार्च २०२२ रोजी हा निकाल दिला आहे.
खंडपीठाने सांगितले की, “लाचेच्या मागणीवर खटला चालवण्याचे प्रकरण संशयास्पद आहे. तसेच पुराव्यातील तफावत लक्षात घेता, आरोपीला संशयाचा फायदा मिळतो आणि तो निर्दोष सुटण्यास पात्र ठरला आहे.
६ नोव्हेंबर १९९४ रोजी मोहोळ तालुक्यातील वाघोली गावातील बाबूराव शेंडे यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला होता. मोहोळ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाने त्याला सीलबंद कव्हरमध्ये एक चिठ्ठी कामटी चौकी येथे चवरे यांच्याकडे दिली. १९ नोव्हेंबर रोजी त्यांनी चवरे यांची भेट घेतली. त्यावेळी चवरे यांनी पत्नीचे म्हणणे रेकॉर्डिंगसाठी आणण्यास त्या व्यक्तीला सांगितले. मात्र शेंडे यांनी चवरे यांना लाच देण्याचे आमिष दाखवले परंतु चवरेंनी लाच घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या शेंडेंनी चवरेंविरुद्ध सापळा रचला. त्यांनी २०० रुपयांची लाच मागितली आहे, असे भासवत शेंडेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि या प्रकरणात त्यांना अडकवले.
हे ही वाचा:
अवघ्या दहा वर्षाची मुलगी शिक्षणासाठी पार पाडते ‘ही’ जबाबदारी
तब्बल चार तास मुलांना घेऊन शाळेची बस गायब!
‘ठाकरे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० ची मॅच सुरु’
चवरे यांच्यावर कारवाई सुरु झाली मात्र त्यांनी जबानीत लाचेची मागणी नाकारली. शेंडे यांनी आपल्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी शेंडे यांना न्यायालयात वैयक्तिक तक्रार करण्यास सांगितले. शेंडे यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले होते.