भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मोठ्या विश्रांतीनंतर अखेर क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. रिषभ पंत १४ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. रिषभ पंत हा आता फिट असून आगामी आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यासाठी पंत पुनरागमन करणार आहे. २०२२ मध्ये रिषभ याचा भीषण कार अपघात झाला होता.
मंगळवारी, बीसीसीआयने खेळाडूंचे मेडिकल अपडेट दिले, ज्यामध्ये रिषभ पंत फिट असल्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) घोषित केले आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये रिषभ मैदानात दिसणार आहे. रिषभ पंत याने त्याच्या पुनरागमन होणार असतानाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “पदार्पणाच्या वेळी ज्या भावना होत्या तसंच वाटतं आहे, दडपण आहे पण उत्साहही आहे,” अशा भावना रिषभ पंत याने व्यक्त केल्या आहेत. तसेच पुन्हा क्रिकेट खेळता येणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही, असेही रिषभ पंत याने म्हटले.
“दिल्ली कॅपिटल्स आणि आयपीएलमध्ये परतण्यास उत्सुक असून ही स्पर्धा खूप आवडते. संघ मालक आणि सहाय्यक कर्मचारी यांचे समर्थन, मार्गदर्शन आणि सहकार्य प्रत्येक टप्प्यावर मिळाले, ज्यासाठी मनापासून कृतज्ञ आहे. माझ्या डीसी कुटुंबासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि चाहत्यांसमोर पुन्हा खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहे,” असं रिषभ पंत म्हणाला. तसेच त्याने हितचिंतक, चाहते आणि बीसीसीआय, एनसीएमधील कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.
हे ही वाचा:
सीएएला राज्यांचा विरोध निरुपयोगी; प्रक्रियेचा राज्यांशी संबंध कमी !
अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
काँग्रेसला रामराम करत पद्माकर वळवी यांचा भाजपात प्रवेश!
इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२४ ही स्पर्धा येत्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २३ मार्च रोजी पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे.