तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमधील सर्वच खेळाडूंच्या भविष्याची चिंता लागून होती. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय महिला संघाच्या खेळाडूंना मंगळवारी काबूलमधून सुरक्षित देशाबाहेर नेण्यात आले आहे. फुटबॉलपटूंची जागतिक संघटना असणाऱ्या ‘फिफप्रो’ यांनी महिला फुटबॉलबॉलपटू संघातील पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. यासाठी मदत दिलेल्या ऑस्ट्रेलिया सरकारचे ‘फिफप्रो’ने आभार मानले आहेत.
अफगाणिस्तानच्या युवा फुटबॉलपटू आणि अधिकारी सर्वच संकटात होते. त्यांच्यासाठी जगभरातून मदतीचे आव्हान करण्यात आले होते. त्यामुळे हे सगळे शक्य झाले, त्यामुळे सर्वांचे आभार, असे ‘फिफप्रो’ने म्हटले आहे. मंगळवारी काबूलहून निघालेल्या विमानात ७५ जण होते, त्यात या खेळाडूंचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वी सत्तापालट झाल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधाराने खेळाडूंना आपली सार्वजनिक ओळख पुसून टाका, सोशल मिडियावरील खाती बंद करा आणि सुरक्षिततेसाठी तुमच्या कीट जाळून टाका, कारण आता परत तालिबानचे वर्चस्व आहे, असे सांगितले होते.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे ममतांसारखे विचारी, संयमी’
ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’
आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा
हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र!!!
अफगाणिस्तानच्या महिला फुटबॉल संघाची स्थापना २००७ मध्ये झाली होती. त्यापूर्वी तालिबानी शासनात महिलांना शिक्षण घेण्यास आणि नोकरी करण्यास बंदी होती. महिलांना बुरखा घालून आणि पुरुषांच्या साथीनेच बाहेर फिरण्यास परवानगी होती. नियम मोडणाऱ्या महिलेला कठोर शिक्षा केली जात असे. गेल्या काही दिवसांपासून खूपच दडपण होते, तणाव होता. मात्र आता आम्ही महत्त्वपूर्ण विजय मिळवला आहे, असे अफगाणिस्तान फुटबॉल संघाची उपकर्णधार खालिदा पोपल म्हणाली.
देशात सत्तापालट झाल्यामुळे खेळाडूंच्या मानसिक स्थिती, पूर्वतयारी तसेच साहित्य या सर्वच गोष्टींवर परिणाम झाला आहे. शिवाय काबूल विमानतळावरून उड्डाणेही निलंबित होत आहेत, म्हणून अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने पाकिस्तानविरुद्धची तीन वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.