अफगाणिस्तानचा तेज गोलंदाज नवीन उल-हकने शुक्रवारी रात्री दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी २७ सप्टेंबर रोजी त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. आपले करीअर दीर्घकाळ चालावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र तो टी-२०चे सामने खेळत राहील, असेही त्याने नमूद केले होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नवीनला चांगलेच झोडपण्यात आले. त्याने ६.३ षटकांत कोणतीही विकेट न घेता ५२ धावा दिल्या. याच सामन्यात ४८व्या षटकात फेहलुकवायो याने तीन चेंडूंतच १६ धावा कुटल्या.
सन २०१६मध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नवीन उल हक याला केवळ १५ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांनी ३२.१८च्या सरासरीने २२ विकेट घेतल्या. यातील आठ विकेट त्यांनी २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत घेतल्या. तर, नवीनने २७ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांत ३४ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. नवीन आयपीएलसह विविध क्रिकेट लीगमधूनही खेळतो.
हे ही वाचा:
कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट; ५८० सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचा आदेश
“एअर ऍम्ब्युलन्स टेक ऑफ झाली नसती तर आयुष्याचं विमान लँड झालं नसतं”
यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार
सेहवाग पाकिस्तानला म्हणाला ‘झिंदाभाग’!
‘आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करणे ही खूप सन्मानजनक बाब आहे. या विश्वचषक स्पर्धेनंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होईन आणि आपल्या देशासाठी टी२० क्रिकेट खेळणे सुरूच ठेवेन. हा निर्णय घेणे खचितच सोपे नाही, मात्र माझे करीअर दीर्घकाळ सुरू राहावे, यासाठी हा निर्णय मला घ्यावा लागला. मी अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ आणि माझ्या चाहत्यांचे आभार मानतो, ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला,’ अशा शब्दांत नवीनने आपला निवृत्तीचा मनोदय जाहीर केला होता.