चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले

अफगाणिस्तानचा दणदणीत विजय, वर्ल्डकपमधील पाकिस्तानचे आव्हान धोक्यात

चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले

चेन्नईतील चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या या महत्त्वाच्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ८ विकेट्सनी मात करत एक वेगळा इतिहास लिहिला. यापूर्वी कोणत्याही वनडे सामन्यात पाकिस्तानला अफगाणिस्तान मात देऊ शकला नव्हता पण चेन्नईत इतिहास घडला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या २८२ धावांना उत्तर देताना अफगाणिस्तानने अवघे दोन फलंदाज गमावून ही धावसंख्या पार केली. जर हा सामना पाकिस्तानने जिंकला असता तर त्यांच्या खात्यात अफगाणिस्तानविरुद्ध ८-० अशी कामगिरी झाली असती पण दिवस अफगाणिस्तानचा होता. पाकिस्तानच्या खात्यात आता ४ गुण आहेत आणि त्यांची पुढील लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तीन सलग पराभव त्यांना पत्करावे लागले होते. या विजयामुळे अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

 

पाकिस्तानने बाबर आझम (७४), शफिक (५८) यांच्या जोरावर अडीचशेचा टप्पा ओलांडला खरा पण अफगाणिस्तानने त्यांच्या सगळया अपेक्षांवर पाणी फेरले. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमनुल्ला गुरबाझ आणि इब्राहिम झदरान यांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली तिथेच अफगाणिस्तानच्या विजयाचा पाया रचला गेला. त्यानंतर रेहमत शाह आणि हसमतुल्ला शाहिदी यांनी आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. ४९व्या षटकात अफगाणिस्तानने विजय मिळविला.

 

अफगाणिस्तानची सुरुवात छान झाली. गुरबाझने शाहीन शाह आफ्रिदीला फाइन लेगला चौकार मारला तर तीन चेंडूंनंतर इब्राहिमने आफ्रिदीला चौकार लगावला. तर गुरबाझने हारिस रौफच्या पहिल्याच षटकात चक्क चार चौकार लगावले. त्यामुळे ९ षटकांत अफगाणिस्तानच्या खात्यात ६० धावा जमा झाल्या. त्यामुळे पहिल्या १५.३ षटकांतच त्यांनी १०० धावांचे लक्ष्य गाठले. तोपर्यंत गुरबाझ आणि इब्राहिम यांची अर्धशतकेही झाली होती.

 

हे ही वाचा:

शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!

देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!

कांदिवलीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

‘गगनयान’ मोहिमेत महिलांचाही सहभाग असू शकतो’!

 

२२ षटकानंतर पाकिस्तानला पहिले यश मिळाले. गुरबाझचा झेल डीप थर्ट मॅनला पकडला. त्यानंतर आलेल्या रेहमतने इब्राहिमसह दुसऱ्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. तेव्हा इब्राहिमच्या पायात पेटके येऊ लागले. मग तो ८७ धावांवर बाद झाला. तेव्हा पाकिस्तानच्या आशा थोड्या जिवंत झाल्या असाव्यात की आता अफगाणिस्तानचा संघ कोसळला तर आपला विजय पक्का पण शाहिदी आणि रेहमत यांनी ते स्वप्न उद्ध्वस्त केले. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी ९६ धावांची अभेद्य भागीदारी केली आणि पाकिस्तानवर एक ऐतिहासिक विजय नोंदविला.

 

पाकिस्तानच्या गोलंदाजांना मात्र यश हाती आले नाही. रेहमत ७७ धावांवर नाबाद राहिला तर शाहिदीने ४८ धावांची नाबाद खेळी केली. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिकने ५८ धावा तर बाबर आझमने ७४ धावा केल्या. त्यानंतर फार मोठी खेळी कुणाला करता आली नाही.

Exit mobile version