सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय कॉलेजियमने मंगळवारी आंध्र उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा आणि ज्येष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केंद्राकडे केली. त्यांचे नाव मंजूर झाल्यास विश्वनाथन हे १२ ऑगस्ट २०३० रोजी न्या. जे बी पारडीवाला यांच्यानंतर सरन्यायाधीश होऊ शकतात. त्यांचा या सर्वोच्च पदावरील कार्यकाळ नऊ महिन्यांचा असेल.
न्यायमूर्ती मिश्रा हे छत्तीसगडचे आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्य अस्तित्वात आल्यानंतर सुमारे २३ वर्षांनी प्रथमच छत्तीसगडला सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधित्व मिळेल. न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. एम. आर. शाह यांच्या निवृत्तीमुळे दोन रिक्त पदे निर्माण झाली आहेत. त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी या दोन शिफारशी करण्यात आल्या.
ज्येष्ठ वकील के. व्ही विश्वनाथन यांचे नाव इतर काही जणांसह गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रक्रियेत आले होते. मात्र, तत्कालीन सरन्यायाधीश यू. यू. लळित यांनी खुल्या चर्चेऐवजी अवलंबवेल्या अन्य यंत्रणेला त्यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमचे सदस्य न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एस. ए. नाझीर यांनी आक्षेप घेतला होता. तर, न्यायमूर्ती एस. के. कौल आणि के. एम. जोसेफ यांनी त्याला पाठिंबा दिला होता.
मंगळवारी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्या. कौल, जोसेफ, अजय रस्तोगी आणि संजीव खन्ना यांच्या कॉलेजियमने विश्वनाथन आणि आंध्र प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती पी. के मिश्रा यांची क्षमता, सचोटी, अनुभव आणि ज्ञान अधोरेखित करून त्यांची शिफारस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीस म्हणून करणारा ठराव मंजूर केला. विश्वनाथन यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. सध्या न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांची ‘वकील मंडळा’ मधून थेट नियुक्ती करण्यात आली आहे. ‘विश्वनाथन हे सर्वोच्च न्यायालयातील वकील मंडळातील प्रतिष्ठित सदस्य आहेत. त्यांचा विस्तृत अनुभव आणि सखोल ज्ञानामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आणखी मूल्यवर्धन होईल, ’ असे त्यात म्हटले आहे.
हे ही वाचा:
हिंदी महासागरात चीनचे जहाज बुडून ३९ जण बेपत्ता
१२ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ १५० कोटींच्या कल्बमध्ये सामील!
वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाही तर १० लाखांचा दंड
मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विश्वनाथन यांना २००९मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते. “विश्वनाथन यांना कायद्याची चांगली जाण आहे आणि ते त्यांची सचोटी आणि प्रामाणिकपणा ओळखले जातात.
न्यायमूर्ती मिश्रा हे १० डिसेंबर २००९मध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि १३ ऑक्टोबर २०२१मध्ये त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्तींच्या अखिल भारतीय ज्येष्ठता यादीत त्यांचे नाव २१व्या क्रमांकावर असले तरी, सर्वोच्च न्यायालयामध्ये छत्तीसगडचे प्रतिनिधित्व नसल्यामुळे त्यांच्या बाजूने कौल दिला गेला.