भेसळयुक्त दूधामुळे आता मुंबईकरांचा जीव धोक्यात आलेला आहे. अस्वच्छ पाणी या भेसळीकरता वापरण्यात येत असल्यामुळे आता अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. मुंबईमध्ये नुकतेच गोरेगाव आणि सांताक्रुझमध्ये छापा मारण्यात आला. यामध्ये भेसळयुक्त दुधाप्रकरणी चार जणांना अटक झालेली आहे. ही टोळी नामांकित कंपन्याच्या दुधाच्या पिशव्या फोडून त्यामध्ये पाणी मिसळून भेसळ करण्याचे काम करीत होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने भल्या पहाटे गोरेगाव सांताक्रुझ येथे छापा टाकून यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून सुमारे ३०० लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतलेले आहे.
दुधाची भेसळ करताना नामांकित कंपन्याच्या दुधाच्या पिशव्या फोडण्यात येतात. एक भाग दुध आणि एक भाग पाणी असे करून भेसळयुक्त दूध तयार केले जाते. अस्वच्छ टाक्यांमधील पाणी याकरता वापरले जाते. केवळ इतकेच नाही तर, एक लिटर दुधाच्या माध्यमातून दोन लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जात आहे.
हे ही वाचा:
रत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
वेळ वाढवा! मुंबईतील ४० टक्के उपाहारगृहे बंद
अंधःकारमय ‘भविष्य’; पालिका निवृत्त कर्मचारी काढणार मोर्चा
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचे छापे
सांताक्रुझमध्ये अमूल, महानंद, अन्नपूर्णा या नामांकित कंपन्यांचे भेसळयुक्त दूध केले जात होते. जांभळीपाडा परिसरामध्ये एका घरात असे दुध केले जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. उपनिरीक्षक विजयेंद्र आंबवडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या जोडीने या चाळीवर पहाटेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यातून त्यावेळी 180 लिटर भेसळ दूध हस्तगत करण्यात आले. हस्तगत केलेले दुध तात्काळ नष्ट करण्यात आले. यावेळी संबंधितांकडून भेसळीसाठी लागणारे साहित्य, अमूल ताजा तसेच अमूल गोल्ड दुधाच्या रिकाम्या पिशव्याही सापडल्या. या चौघांना पुढील कारवाईसाठी वाकोला पोलिसांकडे सोपविण्यात आलेले आहे. गोरेगावमध्येही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आलेले आहे. पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने मालाड आणि गोरेगाव येथे छापे टाकून हा प्रकार उघडकीस आणला. याठिकाणाहून पोलिसांनी सव्वाशे लिटर भेसळयुक्त दुध ताब्यात घेतले आणि नष्ट केले.