अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवार, १५ जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं असून गुजरात सरकारने अलर्ट जारी करून योग्य ती खबरदारी घेतली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम तेथील हवामानावर होत असून बुधवार, १४ जून रोजी गुजरातमधील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.
गुजरातमधील किनारी भागातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्याचे काम सुरु असून आतापर्यंत सुमारे ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफची ३३ पथके तैनात करण्यात आली आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ हे गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या कच्छ, सौराष्ट्र प्रदेश, मांडवी किनारा आणि दक्षिण पाकिस्तानमधील कराचीच्या लगतच्या प्रदेशातून जाणार आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किमी पर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
… म्हणून कोलकातामधील विमानतळावर लागली आग
‘बिपरजॉय’चा असाही वादळी विक्रम
सुसज्ज गुजरात करणार बिपरजॉयचा सामना
अमेरिकी राजदूत डोभालबद्दल म्हणाले, उत्तराखंडच्या गावातला मुलगा राष्ट्राचा आधार बनला!
दरम्यान, बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ओडिशा दौरा पुढे ढकलण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह दोघेही चक्रीवादळावर थेट लक्ष ठेवून आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला असून ते राज्य सरकारच्या आपत्कालीन केंद्रालाही भेट देत आहेत.