श्रीकांत पटवर्धन
तथाकथित निधर्मी / सर्वधर्मसमभावी , पुरोगामी, उदारमतवादी अशा लोकांचा आपल्याकडे सतत एकच उद्योग चाललेला असतो. तो म्हणजे, हिंदुत्ववाद, हिंदुराष्ट्रवाद यांच्या विरोधी भूमिका घेणे, या ना त्या मार्गाने हिंदुहितास बाधा येईल, अशी भूमिका हिरीरीने मांडणे, मांडत राहणे, मग मुद्दा कुठलाही असो.
नुकताच असा एक प्रकार वाचनात आला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा लेख. धनगर आरक्षणाच्या पल्याड हा प्रशांत रुपवते यांचा लेख लोकसत्तेत २१ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाला. वास्तविक मुद्दा अनुसूचित जमातींच्या कल्याणाचा, विकासाचा. पण त्या निमित्ताने हिंदुत्वावर घसरण्याची संधी कोण सोडणार? “संविधानाने अनुसूचित जमातींची ओळख पद्धत निश्चित केली आहे”, – असे रुपवते म्हणतात. ते मुळीच खरे नाही. संविधानाने केलेली अनुसूचित जमातीची व्याख्या – केवळ
“अनुच्छेद 342 नुसार राष्ट्रपतींनी अधिसूचनेद्वारे (Gazette notification द्वारे) एखादी जमात किंवा जमात समूह, किंवा त्यांचे भाग विनिर्दिष्ट केलेले असणे” – इतकीच आहे. रुपवते म्हणतात त्याप्रमाणे त्यांची “ओळख निश्चित करण्याची पद्धत” – त्याचे “निकष” – हे १९६५ मध्ये आलेल्या `लोकूर समिती` अहवालात निर्धारित करण्यात आले. त्यामध्ये – आदिम
जीवनशैली, सर्वसामान्य मागासलेपण, भौगोलिक अलगाव / विलगता किंवा दुर्गम भागात वास्तव्य, बुजरेपणा, इत्यादी बाबी येतात. महत्वाचे म्हणजे त्यात कुठेही आदिवासी हे `हिंदू` नाहीत, असे नमूद केलेले नाही. आदिवासींच्या अनेक पूजा पद्धतींमध्ये – पितर पूजा, भूमी (धरणीमाता) , अग्नि, वायू सारख्या नैसर्गिक शक्तींची देवतास्वरूप मानून उपासना, या गोष्टी येतात, ज्या थोड्याफार फरकाने हिंदू धर्मात आहेत. इंद्र (पर्जन्य) , वायू, जल (वरूण), अग्नि, सूर्य, चंद्र – अशा नैसर्गिक शक्तींची देवतास्वरूप मानून केलेली स्तुती – तशी सूक्ते – ऋग्वेदात बरीच आहेत. भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात पंचविसाव्या श्लोकात पितृपूजेचा स्पष्ट उल्लेख आहे. (यान्ति देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रताः I भूतानि यान्ति भूतेज्या
यान्ति मद्याजिनोsपि माम II भगवद्गीता अध्याय ९, श्लोक २५ ) भगवद्गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे. त्यामुळे अनुसूचित जमातींमध्ये पितर पूजा प्रचलित असल्याने ते हिंदू नव्हेत ह्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही !
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १९१० च्या जणगणनेपासून या समूहांसाठी `आदिम जमाती` नावाची श्रेणी वापरली गेली, पण अद्यापपर्यंत कुठेही `हिंदू` म्हणून त्यांची नोंद करण्यात आलेली नाही… – असे रुपवते म्हणतात, जे वस्तुस्थितीला धरून मुळीच नाही. २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची धर्मानुसार विभागणीची आकडेवारी उपलब्ध आहे. (अनुसूचित जातींसाठी जरी त्या जाती हिंदू धर्मांतर्गत च (हिंदू, शीख, बौद्ध) असण्याचे बंधन आहे, तसे ते अनुसूचित जमातींसाठी नाही, असे लेखकाने लेखाच्या शीर्षकातच म्हटले आहे. ते योग्यच आहे.) अनुसूचित जमातीची व्यक्ती कुठल्याही धर्माची (ती पाळत असलेल्या रीतीरिवाज, पूजा, उपासना पद्धतीनुसार) असू शकते, हे सर्वमान्य, आणि संविधानमान्य आहे. कुठे हिंदू अशी नोंद झालीच असेल, तर त्यास आदिवासींचा विरोध असतो.. हे लेखकाचे असेच आणखी एक धादांत चुकीचे विधान. जनगणनेतील नोंदी या व्यक्तीने स्वतः घोषित केलेल्या वस्तुस्थितीला धरूनच असतात.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला!
पंत ठरला श्रीमंत, आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू!
आंध्र प्रदेशात बसची ऑटो रिक्षाला धडक बसून ७ जण ठार
मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० रुपये कोटींचा झाला!
आता मुख्य मुद्दा : २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची धार्मिक विभागणी, तत्संबंधी आकडेवारी – ही रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त, भारत सरकार (Registrar General & Census Commissioner, Government of India) यांच्याकडे उपलब्ध आहे. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांच्या आर्किव्स (Archives) मधून उपलब्ध आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :
अनुसूचित जमातींमधील हिंदू -८४१.६५ , मुस्लीम -१८.५८, ख्रिश्चन -१०३.२७, शीख – ०.१४, बौद्ध – ८.६६, जैन – ०.१२, इतर -७०.९५, आणि धर्माची नोंद न केलेले – २.०६. – सर्व आकडे लाखांमध्ये आहेत. अर्थात, २०११ मध्ये जनगणने नुसार अनुसूचित जमातींत आठ कोटी एकेचाळीस लाख पासष्ट हजार `हिंदू` आहेत. तशी नोंद सरकार दफ्तरी आहे. असे असताना, अनुसूचित जमातींमध्ये `हिंदू` नाहीतच, असा धादांत खोटा अपप्रचार कशासाठी ? तथाकथित पुरोगाम्यांचा छुपा अजेंडा – मुख्य राष्ट्रीय प्रवाहावर असलेला हिंदूंचा ठसा, त्यांचा प्रभाव, पद्धतशीरपणे कमी करणे, – हा आहे. त्यासाठी अनुसूचित जमाती ह्या मुळी हिंदू नाहीतच, असे धडधडीत खोटे ठोकून देणे, तशा नोंदी कुठल्याही जनगणनेत सुद्धा नाहीत, तशी नोंद करण्यास खुद्द जमातींच्या लोकांचा विरोधच असतो, असे एकाहून एक आश्चर्यकारक जावईशोध लावणे – हे त्यांना सोयीचे वाटते.
वनवासी कल्याण आश्रम सारख्या संघ परिवारातील संघटनांचा प्रयत्न आदिवासी, वनवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा, – सतत चिकाटीने सुरु आहे. त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी निधर्मीवाद्यांच्या ह्या युक्त्या असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्ता सूत्रे हाती घेतल्यावर ताबडतोब (केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत) अनुसूचित जमातींची ओळख पटवण्यासाठी लोकूर समितीने १९६५ मध्ये निर्धारित केलेले निकष – जे जुने, कालबाह्य झालेले आहेत, – ते बदलून अधिक व्यावहारिक, तर्कशुद्ध करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यामागे मूळ उद्देश अर्थातच जमातींना मुख्य प्रवाहात अधिक वेगाने आणण्याचा आहे. निधर्मीवाद्यांना हे नको असल्याने, जमाती मुळात हिंदूच नाहीत. अशी आवई उठवली
जाते ! आपण हिंदुत्ववाद्यांनी अर्थातच हा प्रयत्न हाणून पाडायला हवा. आदिवासी असो, की वनवासी, नगरवासी असो की ग्रामवासी – हिंदू सारा एक ; हेच आपले घोषवाक्य ! हिंदू एक झाला, तरच हिंदुराष्ट्र प्रत्यक्षात येऊ शकेल.