राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन एक वर्ष झाले. तसे महाविकास आघाडीचे सरकार जाऊनही एक वर्ष झाले आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी लाईव्ह राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर ते राज्यपालांकडे गेले आणि त्यांना राजीनामा सुपूर्द केला. गेल्या वर्षभराच्या काळात महाराष्ट्राचे राजकारण १८० अंशाच्या कोनात बदलले आहे. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात घुसमटणारे आदित्य ठाकरे आषाढी एकादशीला टाळ कुटताना दिसतायत.
प्रति पंढरपूर म्हणवले जाणाऱ्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आदित्य ठाकरे टाळांच्या गजरात तल्लीन झाल्याचे वृत्त काल अनेक माध्यमांनी दिले. तेव्हा २०२० च्या शासकीय महापूजेची आठवण झाली. त्या वर्षी शासकीय महापूजा अनेक कारणांसाठी गाजली होती. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून घरातून बाहेर न पडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट एसयूव्हीने ड्राईव्ह करत पंढरपूरपर्यंत गेले होते. त्यांच्या बाजूच्या सीटवर रश्मी ठाकरे स्थानापन्न झाल्या होत्या. पंढरपूरात पोहोचल्यानंतर विठ्ठलाच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक महापूजा केली. त्यावेळी आदित्य ठाकरे सोबत होते. परंतु पूजा सुरू असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते मंदिराच्या बाहेर पडले.
खरं तर तुळशी माळा, हार फुल आणि धुपबत्तीच्या गंधात अस्वस्थ होण्यासारखे काय असते? लोक ज्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी मैलोन् मैल पायपीट करत आलेले असतात, ते केवळ माऊलीच्या मुखदर्शनामुळे सुखावतात. तुम्हाला त्या गाभाऱ्यात उभे राहून पूजा करण्याचे भाग्य मिळते आणि तिथे तुम्हाला अस्वस्थ वाटते हे तुमच्या नशीबाचे कमीपण. सकाळमध्ये हे वृत्त तपशीलात आले होते. परंतु याचा फार बोभाटा झाला नाही. कारण त्या काळात माध्यमं ठाकरेंचा जयजयकार करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवत होती.
हे ही वाचा:
तरुणाच्या हत्येनंतर सलग तीन दिवस फ्रान्स पेटलेला
भारताने जिंकली आठव्यांदा आशियाई कबड्डी
मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग
भारत- पाक सामन्यासाठी हॉटेलचे दर गगनाला भिडले
काल एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरात सपत्निक शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांचा अडीच तीन वर्षांचा नातू रुद्रांश गाभाऱ्यात होता. पहाटे सुमारास पूजा संपेपर्यंत तो शांतपणे संपूर्ण विधी न्याहाळत होता.
तीन वर्षांपूर्वी आदित्य ठाकरे यांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात अस्वस्थ का वाटले त्याचे कारण समजण्यासारखे आहे. नाईट लाईफबद्दल आकर्षण असलेले मंदिराच्या वातावरणात फार सहजपणे वावरू शकत नाहीत.
मविआची सत्ता असताना आदित्य ठाकरे कायम नाईट लाईफबद्दल बोलायचे. मविआच्या सरकारने पंढरीच्या वारीत वारकरी येऊ नयेत म्हणून एकही एसटी सोडू नका, असे आदेश एसटीच्या सर्व विभागांना देण्यात आले होते. वारीसाठी पायी निघालेले ज्येष्ठ वारकरी बंडातात्या कराडकर यांना सरकारने अटक केली होती. मविआचे सरकार एक असे सरकार होते, ज्यांनी राज्यातील मंदिराची दारं उघडण्याआधी दारुची दुकानं उघडायला परवानगी दिली होती. मंदिरं उघडण्यासाठी भाजपाला घंटानाद आंदोलन करावे लागले होते. त्यामुळे मविआ सरकारचा आणि सरकारमधील नेत्यांना मंदिरांबाबत कितपत आस्था आहे, हे जनता समजून होती.
मविआची सत्ता गेली, ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर मातोश्रीचे दरवाजे अचानक लोकांसाठी खुले झाले. मंत्री आणि आमदारांना टाळणारे उद्धव ठाकरे लोकांना भेटू लागले. अनेक लोक शिवबंधन बांधून घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी जाऊ लागले. पोहरा देवीचे महंत सुनील महाराज यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ठाकरेंना पोहरा देवीचा प्रसादही दिला. परंतु ठाकरेंनी तो प्रसाद ग्रहण न करता, शेजारी उभ्या असलेल्या नेत्याच्या हातात सरकवला. कॅमेराच्या समोर हे घडले होते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांचा भक्तीभाव हा असा होता. परंतु सत्ता गेल्यानंतर ठाकरे पिता-पुत्रांमध्ये प्रचंड बदल झालाय. सवयींना हळूहळू मुरड घालावी लागते आहे. मुख्यमंत्री म्हणून फक्त दोनदा मंत्रायलात गेलेले उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राच्या वेशी ओलांडून प्रवास करतायत. ठाकरेंचे आजारपण पूर्ण संपलेले आहे. गळ्यातला पट्टा गेला आहे. एक नवा जोश आणि आक्रमता त्यांच्यात संचारली आहे. कधी काळी खाजवावं कसं हा प्रश्न पडलेले ठाकरे आता लढण्याची भाषा करतायत. ते ऑनलाईन वरून ऑफलाईन झाले आहेत. ते आता कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करतायत.
वडिलांच्या सक्रियतेतून आदित्य ठाकरे यांनाही प्रेरणा घेतलेली आहे. त्यांनाही एकादशी दिवशी भक्तीमार्गावर थोडी फार वाटचाल करावीशी वाटली. एकादशीच्या दिवशी वडाळ्याच्या विठ्ठल मंदीरात जावेसे वाटले. टाळांचा गरज करावासा वाटला हेही काही कमी नाही. अनेकांना सत्तेमुळे बळ मिळतं. उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्यामुळे बळ मिळालेले आहे. ठाकरेंना इतका जोश आलेला आहे, की ते आता भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार आहेत. राज्यात मविआ सरकार असताना ज्यांच्या गृहमंत्र्यावर फक्त मुंबईत महिना शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप झाला. २५ वर्षे ज्यांनी महापालिकेत सत्ता राबवली. ज्यांच्यावर साडेबारा हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते ठाकरे पिता-पुत्र उद्या जेमतेम एक वर्ष निर्नायकी असलेल्या महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चा काढणार आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)