चांद्रयान- ३ मोहिमेच्या यशानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच इस्रोने आणखी एका मोठ्या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल 1’ उपग्रहाचे शनिवार, २ सप्टेंबर रोजी यशस्वी प्रक्षेपण केले. सकाळी ठीक ११.५० मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
सतीश धवन अवकाश केंद्रातून ‘आदित्य एल 1’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच इस्रोच्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं आणि नवी रहस्य उलगडण शक्य होणार आहे.
दहा दिवसांपूर्वीच भारताने इतिहास रचत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश हा मान मिळवला आहे. चंद्राच्या यशस्वी मोहीमेनंतर आता इस्रोच्या सूर्य मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून असणार आहे.
पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास
पाच टप्प्यांमध्ये आदित्य यान सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरेल. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाच्या सूर्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात होईल.
हे ही वाचा:
सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीवर गुन्हा दाखल
डिजिटल इंडियाचे ऑगस्टमध्ये युपीआयद्वारे १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार!
चांद्रयान- ३ पेक्षाही कमी खर्चात आदित्य L1 सूर्याकडे पोहचणार
जेट एअरवेजचे नरेश गोयल यांना अटक
चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे. याठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल.