रेल्वे अपघातामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार अदानी, सेहवाग उचलणार

अदानी, सेहवाग यांनी ट्विट करून व्यक्त केली इच्छा

रेल्वे अपघातामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार अदानी, सेहवाग उचलणार

ओदिशा येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उद्योगपती गौतम अदानी आणि क्रिकेटपटू वीरेंदर सेहवाग यांनी केली आहे.

ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात २७५ जणांना प्राण गमवावे लागले. तर जवळपास १००० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या अपघातात ज्या मुलांना आपले पालक गमवावे लागले आहेत, त्यांच्या शिक्षणाचा भार अदानी उद्योगसमुह तसेच सेहवाग वाहणार आहे. अदानी यानी रविवारी ट्विट करत ही माहिती दिली.

ऊर्जा, विमानतळे, बंदरे अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी उद्योगसमुहाने म्हटले आहे की, या रेल्वे अपघातात बळी गेलेल्यांना मदत करणे आणि त्यातील पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे ही आमची जबाबदारी आहे.

अदानी यांनी लिहिले आहे की, या रेल्वे अपघातामुळे आम्ही सगळेच हेलावून गेलो आहोत. अदानी उद्योगसमुहाने हे ठरविले आहे की, आम्ही या अपघातात ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडले आहेत, त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलत आहोत. ही आमची संयुक्त जबाबदारी आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीवर धडकली आणि नंतर दुसरीकडे येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसचे दोन डबेही अपघातग्रस्त झाले. त्यात २७५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

अशा प्रकारची भूमिका तडाखेबंद क्रिकेटपटू वीरेंदर सेहवागनेही घेतली आहे. त्यानेही ट्विट करत या अपघातग्रस्तांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या अपघातात ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना गुरुग्राम येथील सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत मोफत शिक्षण दिले जाईल, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.

सेहवाग आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, या दुःखाच्या परिस्थितीत मी एवढे नक्की करू शकतो की, ज्या मुलांचे पालक या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या शिक्षणाचा भार उचलू शकतो. सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत हे मोफत शिक्षण या मुलांना दिले जाईल. अदानी उद्योगसमुहाने ही घोषणा केल्यानंतर सेहवागनेही अशाच प्रकारची घोषणा करून मदतीचा हात पुढे केला.

Exit mobile version