मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. सीमा देव यांनी विविध मराठी आई हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता.

सीमा देव यांना २०२० मध्ये अल्झायमर या आजाराने ग्रासलं होतं. याची माहिती त्यांचा मुलगा अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन दिली होती. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी सकाळी ७ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. “सीमा देव यांनी मराठी चित्रपटसृष्टी अनेक वर्ष गाजवली. त्यांचा स्वभाव खूप छान होता. एक चांगली अभिनेत्री आपण गमावली आहे.” अशा भावना अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या आहेत. सीमा देव यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी ४.३० वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

चांद्रयान- ३ मोहिमेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ

चांद्रयानात इस्रोकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर

विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत दिल्लीतील जामा मशिदीला नोटीस

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या शैलीने त्यांनी  मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये रमेश देव यांचेही निधन झाले होते. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्यं आहेत.

Exit mobile version