हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नुशरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली असून तिच्याशी संपर्क होत नसल्याचे तिच्या टीममधील एकाने सांगितले.‘नुशरत भरुचा हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेली होती. दुर्दैवाने ती तिथे अडकली आहे,’ असे तिच्या एका टीम मेंबरने सांगिले. ‘मी रात्री साडेबारा वाजता तिच्याशी शेवटचा संपर्क साधू शकलो होतो. तेव्हा ती तळघरात सुरक्षित होती.
तिच्या सुरक्षेसाठी मी आणखी माहिती उघड करू शकत नाही. मात्र तेव्हापासून आम्ही तिच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र तो होऊ शकलेला नाही. नुशरत सुरक्षितरीत्या भारतात परतावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला आशा आहे की, कोणत्याही दुखापतीविना आणि कोणतीही इजा न होता, ती भारतात परतेल,’ असे या व्यक्तीने सांगितले.
हे ही वाचा:
हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर
ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा
एनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे का उपटून टाकण्यात आली?
विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय!
हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे कोणतीही चाहूल न देता इस्रायलवर हजारो रॉकेटचा मारा केल्यामुळे आखाती युद्धाला तोंड फुटले आहे. या हल्ल्यात किमान २०० जण ठार तर हजारांहून अधिक जण जखमी झाल्याची चर्चा आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीवरून सुमारे पाच हजारांहून अधिक रॉकेटचा मारा केला. अनेक इस्रायली सैनिक सीमेजवळ पकडले गेल्याचे म्हटले जात आहे.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘हे युद्धच आहे. या हल्ल्याची आणि आगळिकीची शत्रूला किंमत मोजावीच लागेल,’ असा इशारा दिला आहे. तर, हमासचा लष्करी म्होरक्या मोहम्मद डेव्ह याने ‘सहा वर्षांची नाकाबंदी, इस्रायली छापे, हिंसाचार, पॅलेस्टिनींवर वाढते हल्ले यांना दिलेले हे प्रत्युत्तर होते,’ अशी दर्पोक्ती केली आहे.