ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे निधन झाले असून त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये प्रमुख तसेच साहाय्यक भूमिका केल्या आहेत. अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आणि काही मराठी नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी कला क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे.
‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटके फार गाजली असून त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून दाद मिळाली आहे. माधवी गोगटे यांनी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतही ‘घनचक्कर’ या चित्रपटात काम केले होते. तसेच ‘हे खेळ नशिबाचे’ या मराठी चित्रपटात काम केले होते. ‘स्टार प्रवाह’वरील ‘स्वप्नांच्या पलीकडले’ आणि ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ अशा मराठी मालिकांतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या.
हे ही वाचा:
‘तपास सीबीआयकडे दिल्यास परमबीर हजर होतील’
पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या रसायनाची अॅमेझॉनवरून खरेदी
अनिल परब-शरद पवार वरळीत भेटले!
अभिनंदन! अभिनंदनचा वीर चक्रने सन्मान
‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘मिसेस तेंडुलकर’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत.
सध्या त्यांची ‘सिंदुर की किमत’ ही हिंदी मालिका ‘दंगल टीव्ही’वर सुरू होती. काही दिवसांपूर्वी त्या ही मालिका सोडणार असल्याची बातमी समोर आली होती. तत्पूर्वी ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेमध्येही त्यांनी काम केले होते. या मालिकेत अनुपमा या नायिकेच्या आईचे पात्र त्यांनी साकारले होते. त्यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे.