पन्नास ते सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन झाले. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली होती.
पन्नास ते सत्तरच्या दशकात अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, आशा पारेख, शर्मिला टागोर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर आशा नाडकर्णी यांनी काम केले होते. त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी माध्यमांना दिली. गेली अनेक वर्षे त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. आशा नाडकर्णी यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा त्या १५ वर्षांच्या होत्या. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. १९५७ ते १९७३ ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे.
मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षांपासून त्या हिंदी चित्रपटात काम करू लागल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या ‘मौसी’ या चित्रपटात पहिली संधी दिली होती. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाबरोबर ‘गुरू और चेला’, ‘चिराग’, ‘फरिश्ता’, ‘श्रीमानजी’, ‘दिल और मोहब्बत’, ‘अलबेला मस्ताना’ अशा विविध हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले. मराठीतही ‘श्रीमान बाळासाहेब’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मानला तर देव’ सारख्या चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.
हे ही वाचा:
मागाठाणे जमीन खचल्याप्रकरणी दोघाना अटक व जामीन
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर
येणार तर ‘नरेंद्र मोदीचं’; नितीन गडकरी यांची ‘भविष्यवाणी’ !
गुगली टाकून पवारांकडून उरलेले सत्य वदवून घेईन!
वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली अनेक वर्षे आशा नाडकर्णी मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.