अभिनेता विवेक ऑबेरॉय याने एका मुलाखतीत स्वतःचा स्ट्रगल सांगताना सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींनाही उजाळा दिला. विवेक हा सुशांतसिंह राजपूतच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित होता. त्यावेळच्या प्रसंगाबाबतही त्याने यावेळी सांगितले.
‘मी सुशांतला भेटलो आहे. त्याच्याशी गप्पा मारल्या आहेत. खूप चांगला मुलगा होता आणि त्याच्यात गुणवत्ताही ठासून भरली होती. आपण त्याला ज्याप्रकारे गमावले आहे, ते अतिशय दुःखद आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर माझ्याही जीवनात असा टप्पा आला होता, जो अतिशय अंधःकारमय होता. तेव्हा व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही सारे काही चुकीचे घडत होते. सुशांतने जे केले, तेच करण्याचा विचार माझ्याही मनात येत होता,’ अशी कबुली विवेक ऑबेरॉय याने दिली. ‘मी भाग्यवान आहे की, माझ्याकडे ते घर आहे, ते कुटुंब आहे. ज्यांनी कठीण प्रसंगी मला सावरले. मी जमिनीवर बसलो, एका लहान मुलासारखे आईच्या कुशीत शिरलो आणि रडलो. माझ्याबाबत हे काय होतेय, याचा विचार मी केला,’ असे विवेक सांगत होता.
हे ही वाचा:
भारताचा इंग्लंडवर पाच विकेट्स राखून विजय; सामन्यासह मालिका खिशात
मुस्लीम समाजाने पंतप्रधान मोदींना विरोध करू नये
आधी ग्रामस्थांकडून चपलेने मार, नंतर तृणमूलचा नेता पोलिसांच्या ताब्यात!
दारिद्र्यपातळी लक्षणीयरीत्या ५ टक्के खाली
सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी २० जण उपस्थित होते. त्यात मी एक होतो. त्या पावसात मी त्याच्या वडिलांचे दुःखाने ओतप्रोत भरलेले डोळे पाहिले. तेव्हा माझ्या मनात केवळ एकच विचार आला. मित्रा, जर तू हे पाहिले असतेस, जर तू पाहू शकला असतास की तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांवर आता काय परिणाम झाला आहे, तर तू हे पाऊल उचलू शकला नसतास. विचार कर, जे तुझ्यावर खरे प्रेम करतात, त्यांना किती दुःख होते. तू त्यांच्याजवळ जा, ज्यांच्यावर तू प्रेम करतोस. तू रडशील तर यातून बाहेर पडशील,’ असे विवेकने सांगितले.