सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (४७) याला गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला असून त्याच्यावर मुंबईतील अंधेरी परिसरातील बेलेव्ह्यु रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
श्रेयस तळपदेवर गुरुवारी रात्री १० वाजता अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याची प्रकृती आता ठीक आहे. त्याच्यावरची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
‘श्रेयस याला संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रात्री १० वाजता सर्व शस्त्रक्रिया पार पाडली. त्याची प्रकृती आता ठीक असून काही दिवसांतच त्याला घरी सोडण्यात येईल,’ असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबईमध्ये शूटिंग सुरू असताना श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते.
तो ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हे ही वाचा:
संसद घुसखोरी प्रकरणातील मास्टरमाईंड ललित झा शरण
धर्मांतरित व्यक्तींना आदिवासींचे लाभ नको ! विधान परिषदेत मागणी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करणार
श्रेयस तळपदे हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सन २००५मध्ये ‘इक्बाल’ चित्रपटाद्वारे त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यावेळी त्याच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शहा यांचीही महत्त्वाची भूमिका होती. श्रेयस याने अनेक मराठी कार्यक्रम आणि नाटके केली आहे. श्रेयस तळपदे लवकरच कंगना राणावत दिग्दर्शित इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. त्यात तो भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे.