कतारमधून आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्याच्या मोहिमेच्या नेतृत्वाची धुरा स्वतः पंतप्रधान मोदी यांनी सांभाळली होती. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सहावेळा गुपचूप कतारला पाठवले. पंतप्रधान मोदी यांचा सल्ला, परराष्ट्र मंत्रालय आणि विविध भारतीय गुप्तचर संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे त्यांची मुक्तता होऊ शकली.
गुप्तचर संस्था गेले वर्षभर यासाठी सातत्याने प्रयत्न करत होत्या. अजित डोभाल यांनी कतार सरकार आणि तेथील अमिर शेख तमीम बिन हमद अली थानी यांच्या निकटवर्तीयांना सद्यस्थितीतील भू-राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिली. तर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली समिती व्यूहात्मक बाजू सांभाळत होती.
हे ही वाचा:
केरळच्या सत्ताधारी खासदाराने मोदींसह घेतले जेवण!
मंदिरातील ४० किलोच्या सिंहासनासह चोर पळाले
रामायण, महाभारत काल्पनिक असल्याचे धडे दिल्यानंतर बंगळूरूमध्ये शिक्षिकेचे निलंबन
राज्यात माघी गणेशोत्सवाचा आनंद
या संदर्भात सौदी अरेबियासह अन्य आखाती देशांसोबतही चर्चा सुरू होती. परदेशात कार्यरत असलेल्या गुप्तचर संस्थांनीही मोलाची कामगिरी बजावली. कतार सरकारने या आठही माजी नौसेनिकांवर लावलेल्या हेरगिरीच्या आरोपांबाबत कोणतीच माहिती दिली नव्हती. मात्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केलेल्या प्रयत्नांनंतर उच्च स्तरावर ही माहिती देण्यात आली. याच माहितीच्या आधारे भारताने आपली बाजू भक्कम मांडली.
भारत सरकारवरील विश्वास आणखी मजबूत
कतारमधील भारतीयांची सुटका म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, हेच स्पष्ट होत असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. त्यांना चुकीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. ते घरी परतल्यामुळे सरकारप्रति विश्वासात आणखी वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.