देशात लवकरच लोकसभा निवडणुका लागणार असून यासाठीची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने या अनुषंगाने नियमावली जारी केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारात आणि रॅलीत लहान मुले आणि अल्पवयीन मुलांचा वापर करण्यास मनाई केली आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
लहान मुलांना निवडणूक प्रचारावेळी पत्रक वाटप करण्यास सांगू नका, पोस्टर चिपकवायला लावू नका आणि पक्षाचे झेंडे हातात घेऊन मुलांना घोषणा द्यायला लावू नका. अन्यथा कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करणं हे निवडणूक नियमांचा भंग ठरणार आहे.
कोणत्याही प्रकारे लहान मुलांना निवडणूक प्रचारात सामील करून घेणं, त्यांच्याकडून कविता, गाणी म्हणून घेणं तसेच त्यांना घोषणा द्यायला लावणं आदी गोष्टी करून घेणं म्हणजे निवडणूक नियमांचे उल्लंघन ठरणार आहे. तसेच लहान मुलांकडून प्रचार चिन्हांचा प्रचार करून घेण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
शिवाय असे आढळल्यास; एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने निवडणुकीत लहान मुलांचा वापर केल्याचे लक्षात येताच त्यांच्यावर बालकामगार कायद्यांसह इतर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. लहान मुलांचा निवडणूक प्रचारात वापर केल्याचं आढळून आल्यास राजकीय पक्ष आणि उमेदवारांवर बाल कामगारद्वारे (निषिद्ध आणि विनियमन) सुधारीत बाल कामगार (निषिद्ध आणि विनियमन) अधिनियमन, १९८६ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींची यात्रा देशाचे नुकसान करण्यासाठी!
पाकिस्तानात पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, १० पोलीस ठार तर ६ जखमी!
‘सातत्याने माझा सल्ला धुडकावल्यानेच तुरुंगात जाण्याची वेळ’
निवडणूक आयोगाने नियमावलीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला दिला आहे. सुधारीत अधिनियम, २०१६ नुसार सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर होणार नाही हे निश्चित करावं आणि राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना त्याची परवागनी देऊ नये.