अल्लू अर्जुनच्या घरावरील हल्ल्यातील आरोपींना जामीन, रेवंत रेड्डींशी संबंध!

बीआरएस नेत्याने केला दावा, मुख्यमंत्र्यासोबतचा आरोपीचा फोटो शेअर

अल्लू अर्जुनच्या घरावरील हल्ल्यातील आरोपींना जामीन, रेवंत रेड्डींशी संबंध!

तेलगु अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्लाकरणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी काल सहा जणांना अटक करण्यात आली होती. हैदराबादच्या स्थानिक न्यायालयाने यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणावरून एका बीआरएस नेत्याने मोठा दावा केला आहे. या प्रकरणातील आरोपी रेड्डी श्रीनिवास हा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा सहकारी असल्याचे बीआरएस नेत्याने म्हटले आहे. बीआरएस नेत्याच्या आरोपावर रेवंत रेड्डी किंवा काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

उस्मानिया विद्यापीठाच्या अनेक सदस्यांनी रविवारी (२२ डिसेंबर) तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील निवासस्थानावर हल्ला केला आणि मालमत्तेचे नुकसान केले. ४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीत मृत्यू झालेल्या ३५ वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी या आंदोलकांनी केली. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती. आरोपींना आज (२३ डिसेंबर) स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने प्रत्येकी १० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.

हे ही वाचा : 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून आप सरकारच्या विरोधात ‘आरोप पत्र’ जारी

घराचे नाव ‘रामायण’ अन घरच्या लक्ष्मीला कोणीतरी पळवून नेईल!

आगरतळा रेल्वे स्थानकावर ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!

पंतप्रधान मोदींकडून ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

दरम्यान, बीआरएस नेते कृष्णांक यांनी आरोप केला आहे की, या प्रकरणातील सहा आरोपींपैकी एक श्रीनिवास रेड्डी आहे. श्रीनिवास रेड्डी हा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा जवळचा सहकारी होता आणि २०१९ च्या जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघ (ZTPC) निवडणुकीत कोडंगलमधून काँग्रेस उमेदवार असल्याचे नेत्याने म्हटले आहे. कृष्णांक यांनी ट्वीटरवर आरोपी श्रीनिवास रेड्डी याचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत दिसत आहे.

ते म्हणाले, उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीने (OUJAC) २००९ मध्ये तेलंगण आंदोलन सुरू केले होते. हिंसाचार आणि ब्लॅकमेलसाठी त्याचा वापर करणे घृणास्पद आहे. अल्लू अर्जुनच्या निवासस्थानावर हल्ला करणारा रेड्डी श्रीनिवास हा उस्मानिया विद्यापीठाचा विद्यार्थी नेता नाही. तो रेवंत रेड्डी यांचा जवळचा सहकारी आणि २०१९ च्या जिल्हा परिषद (ZTPC) निवडणुकीत कोडंगलमधील काँग्रेसचा उमेदवार राहिला आहे.

Exit mobile version