भारताच्या सैनिकांच्या वीरगाथा माहित आहेतच, परंतु एका जवानाचा सुट्टीवर येत असतानाच दुर्दैवी मृत्यु घडल्याची घटना घडली आहे. सियाचिनमध्ये तैनात असलेला हा सैनिक आपला कार्यकाळ संपवून सुट्टीवर येत होता, परंतु त्याचवेळी या सैनिकाचा अंत झाला.
कैलास भारत पवार असे या शूर सैनिकाचे नाव आहे. चिखली गावाचा सुपुत्र असलेला कैलास सियाचिन येथे तैनात करण्यात आला होता. तेथील कर्तव्य संपवून घरी परतत असताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरून त्याचा दुर्दैवी अंत झाला. कैलास २ ऑगस्ट २०२० पासून ३ महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य बजावत होता.
हे ही वाचा:
ईव्हीएम विरोधकांना न्यायालयाने काय चपराक लगावली?
मुंबईतील या घरांचे काम पुरते रखडले!
भारतीय महिला हॉकी संघाच्या यशात या दांपत्याचाही वाटा
अमित शहा-शरद पवार भेटीचे दरेकरांनी काय कारण सांगितले?
सियाचीनमधील त्याची ड्युटी १ ऑगस्ट रोजी संपली होती. त्यानंतर तो परत यायला निघाला होता. आपल्या सहकाऱ्यांसह सामान घेऊन तो खाली उतरत होता. त्यावेळी बर्फाळ कड्यावरून त्याचा पाय घसरला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शक्य तेवढ्या लवकर लडाख येथील रुग्णालयात हलवले. परंतु उपचारादरम्यान १ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यु झाला.
सियाचिन हे जगातील सर्वात उंच रणक्षेत्र असून इथे सतत कडाक्याची थंडी असते. अशा थंडीतदेखील आपले शूर जवान पहाऱ्यावर उभे असतात. त्याच ठिकाणी कर्तव्य निभावणाऱ्या कैलास यांच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कैलास चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी होते.