आसाम पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या वादग्रस्त महिला उपनिरीक्षक जुनमोनी राभा यांचा मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यांची गाडी आणि ट्रकची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला. ही घटना नागाव जिल्ह्यात घडली. पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये नोंदणी असलेला हा ट्रक जप्त केला असून चालक अपघातानंतर फरार झाला आहे.
३० वर्षीय जुनमोनी राभा यांना आसाममध्ये ‘दबंग कॉप’ आणि ‘ लेडी सिंघम’ नावाने ओळखले जात असे. अनेक वादग्रस्त घटनांमुळे त्या परिचित होत्या. अपघातावेळी त्या त्यांच्या खासगी गाडीमध्ये एकट्या होत्या. तसेच, त्या पोलिसांच्या गणवेशातही नव्हत्या. ही दुर्घटना कलियाबोर अनुमंडलच्या जाखलाबांधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सरुभुगिया गावामध्ये झाली.
‘मंगळवारी पहाटे सुमारे अडीचच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमी जुनमोनी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,’ अशी माहिती जाखलाबांधा पोलिस ठाण्याचे प्रभारी पवन कलिता यांनी दिली. मात्र, त्या पोलिसांच्या गणवेशाशिवाय तसेच, कोणाही पोलिसाला सोबत न घेता, कुठे चालल्या होत्या याबाबत कळू शकलेले नाही. त्यांच्या कुटुंबीयही याबाबत काही सांगू शकले नाहीत.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक
जुनमोनी सध्या मोरीकोलाँग पोलिस ठाण्याच्या प्रभारी होत्या आणि गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केल्यामुळे चर्चेतही राहायच्या. मात्र, आर्थिक गैरव्यवहारांचेही त्यांच्यावर आरोप होते. गेल्या वर्षी जून महिन्यात कथित भ्रष्टाचाराप्रकरणी त्यांना माजी प्रियकरासोबत अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
‘द केरला स्टोरी’मध्ये द्वेषयुक्त भाषण; प. बंगाल सरकारचा दावा
‘गोल्फादेवी’चा जयजयकार, समर्थ स्पोर्टसही विजेते
काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार
सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’
भाजपच्या आमदाराशी वाद
जुनमोनी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आणि त्या पुन्हा सेवेत रूजू झाल्या. जानेवारी २०२२ मध्ये भाजपचे आमदार अमितकुमार भुइया यांच्याशी टेलिफोनवर झालेला वाद चव्हाट्यावर आला होता. अवैधरीत्या मशीन लावून संचलन करणाऱ्या देशी बोटींवर जुनमोनी यांनी कारवाई केली होती. तसेच, काही नाविकांना अटकही केली होती. त्यामुळे भुईया यांच्या मतदारसंघातील लोकांनी जुनमोनी यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला होता. या सर्व घटनाक्रमाची ऑडिओ टेप नंतर ‘लीक’ झाली होती.