समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावर आता आयकर विभागाने आपला मोर्चा वळवला आहे. आझमी यांच्याशी संबंधित ३० हून अधिक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आझमी यांचे निकटवर्तीय आभा गणेश गुप्ता यांच्यावरही आयकर विभागाने छापे टाकले आहेत. हे छापे बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशाशी संबंधित असल्याचे म्हटले जातेय. मुंबई, दिल्ली, कोलकाता, कानपूर आणि लखनऊ यांसह अन्य ठिकाणांवर आयकर विभागाने जोरदार मोहिम राबवलीय.
अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. तर आभा गुप्ता या अबू आझमी यांच्या जवळच्या आणि सपाचे सरचिटणीस गणेश गुप्ता यांच्या पत्नी. गणेश गुप्ता यांचे निधन झाले आहे. आभा गुप्ता यांनी काही कंपन्यांमध्ये बेनामी गुंतवणूक केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळेच आयकर विभागाने ही छापेमारी केलेली आहे. कुलाब्यातील आभा गुप्ता आणि अबू आझमी यांचे कार्यालय असलेल्या कमल मेन्शनवरही आयटीने छापा टाकला आहे.
हेही वाचा :
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे घरात असतानाच विकृत आफताबने आणली नवी मैत्रीण
विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
झोमॅटो, स्वीगीचे टी-शर्ट घालून फिरतेय लुटारूंची टोळी
याशिवाय मुंबई, दिल्ली, कोलकाता, कानपूर आणि लखनऊ येथे आयकर विभागाने छापे टाकले आहेत. वाराणसीतील विनायक निर्माण लिमिटेड कंपनीच्या आवारातही छापा टाकण्यात आलेला आहे. आभा गुप्ता यांनी कंपनीत मोठी बेनामी गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. याशिवाय विनायक रिअल इस्टेट ग्रुपही आयटीच्या रडारवर आहे.
अबू आझमी मुंबईच्या दिशेने
अबू आझमी अमरावती दौऱ्यावर आहेत. तेथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे नियोजित दौऱ्यानुसार अबू आझमी आज अकोल्याला जाणार होते. मात्र, आयकर विभागाच्या छाप्याचे वृत्त येताच त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे. मी नुकतेच मुंबईतील माझ्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनीही घरावर कोणताही छापा पडला नसल्याचे सांगितले आहे. तातडीच्या व्यावसायिक कामासाठी मी मुंबईला जात आहे. त्यामुळे आजचा अकोला दौरा रद्द केला आहे, असे अबू आझमी यांनी सांगितले.