मानखुर्द- शिवाजी नगर मतदार संघातून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगाण गात औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले असून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही यावरून वादंग सुरू आहे. त्यांच्यावर चौफेर टीका केली जात असतानाचं आता अबू आझमी यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली जात असताना त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. त्यात विधीमंडळाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. सोमवारी विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी औरंगजेबबद्दल वक्तव्य केलं होतं. यानंतर एकूणच आक्रमक भूमिका पाहता त्यांनी आता माघार घेतली आहे. अबू आझमी यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ पोस्ट करत आपले मत मांडले आहे.
व्हिडीओमध्ये अबू आझमी यांनी म्हटलं आहे की, अधिवेशनाचे दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर बाहेर येताच माध्यमांनी प्रश्न विचारला की, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना औरंगजेबासारखे दाखवले. यावर बोलताना मंदिरांना पैसे देण्यासंबंधीचे वक्तव्य केलं जे इतिहासकारांनी, लेखकांनी मांडले आहे. एखादे वादळ आल्यासारखे या विषयाला वाढवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज यांचा आम्ही आदर करतो आणि सर्वांनी केला पाहिजे. यांनी सर्वधर्मियांना समान दर्जा दिलेला. इतिहासकारांनी लिहिलेल्या गोष्टीवर भाष्य केले, कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द आणि संपूर्ण वक्तव्य मागे घेतो. यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे अधिवेशन तहकूब होणं जनतेसाठी चांगली गोष्ट नाही.”
मेरे शब्दों को तोड़-मरोड़ कर दिखाया गया है। औरंगज़ेब रहमतुल्लाह अलेह के बारे में मैंने वही कहा है जो इतिहासकरों और लेखकों ने कहा है। मैंने छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज या अन्य किसी भी महापुरषों के बारे में कोई अपमानजनक टिपण्णी नहीं की है – लेकिन फिर भी मेरी इस बात से कोई… pic.twitter.com/k7PY0ICe3b
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) March 4, 2025
हे ही वाचा:
उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज
भोपाळमध्ये महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार उभारणार
मोबाईल चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत मृत्यू
दिलीप जायस्वाल यांच्या निवडीची औपचारिकता शिल्लक
अबू आझमी यांनी म्हटले होते की, “चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती राज्य कारभाराची होती आणि हिंदू व मुस्लिम अशी नव्हती.” यानंतर अधिवेशनाच्या कामकाजावेळी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांना निलंबित करण्याचा आग्रह केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील अबू आझमींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही औरंगजेबाचे केवळ मतांसाठी तुष्टीकरण होत असेल तर अशा विचारांचे तुकडे तुकडे करायला हवेत. यासाठी अबू आझमी यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती.