पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाक याने पाकिस्तान क्रिकेट मंडळावर टीका करताना अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर रझ्झाकने त्याबदद्ल माफी मागितली आहे. आपल्या तोंडून चुकून ते उद्गार बाहेर पडले. आपला तसा कोणताच उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण रझ्झाक याने दिले आहे.
रझ्झाकचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतातील चाहते आणि अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्याच्यावर टीका केली होती. मात्र रझ्झाक याने एक व्हिडीओ शेअर करून सर्वांची माफी मागितली आहे. ‘काल पत्रकार परिषदेत क्रिकेटवर, प्रशिक्षणावर चर्चा सुरू होती. माझी जीभ घसरली. मला वेगळेच उदाहरण द्यायचे होते पण माझ्या तोंडून चुकून ऐश्वर्याजींचे नाव आले. मी याबद्दल माफी मागतो. माझा हा हेतू नव्हता. मला वेगळेच उदाहरण द्यायचे होते, पण माझ्या तोंडून भलतेच बाहेर पडले. मी माफी मागतो,’ असे रझ्झाकने या संदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा:
५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!
गाझातील रुग्णालयाखाली हमासची भुयारे आणि शस्त्रसाठा
रझ्झाक याने हे वादग्रस्त विधान केले, तेव्हा तिथे शाहिद आफ्रिदी, उमर गूल यांसारखे माजी क्रिकेटपटूही उपस्थित होते. तेही त्यावेळी हसताना दिसत आहेत. मात्र आफ्रिदीने नंतर याबाबतचे स्पष्टीकरण दिले. ‘आम्ही व्यासपीठावर बसलो होतो आणि रझ्झाकने काहीतरी सांगितले. तो काय बोलला, हे मला समजले नाही. मी असाच हसत होतो. तेव्हा अन्य लोकही हसत होते. मी घरी आल्यानंतर कोणीतरी मला क्लिप शेअर केली. तेव्हा मला कळले की, तो काय बोलून गेला आहे. मी तेव्हा हसलो मात्र अशाप्रकारे विनोद करणे चुकीचे होते, असे झाले पाहिजे नव्हते,’ असे आफ्रिदीने नंतर स्पष्ट केले.