डोंबीवलीचे माजी नगराध्यक्ष श्रीपाद वामन पटवारी यांचे निधन झाले आहे. आबासाहेब पटवारी या नावाने ते प्रसिद्ध होते. आबासाहेबांच्या निधनाला वृद्धापकाळ कारणीभूत ठरला.
मंगळवार २० एप्रिल रोजी संध्याकाळी आबासाहेब पटवारी यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. आबासाहेब यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये वावर होता. पत्रकार म्हणून देखील त्यांनी काम केले असून साप्ताहिक विवेकचे ते कार्यकारी संपादक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांत आबासाहेबांची जडणघडण झाली होती. राजकारणात सक्रिय असणाऱ्या आबासाहेबांनी डोंबीवलीचे नगाराध्यक्ष पद भूषविले. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींसोबतही आबासाहेबांचा विशेष स्नेह होता. सांस्कृतिक शहर अशी ओळख असणाऱ्या डोंबीवली शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत आबासाहेबांचे खूप मोठे योगदान आहे. डोंबिवलीच्या प्रसिद्ध अशा हिंदू नववर्ष स्वागतयात्रेची सुरूवात १९९९ साली आबासाहेबांनी केली.
हे ही वाचा:
राज्यांनी लक्षात ठेवावे, लॉकडाउन अंतिम पर्याय!
महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
तृणमुलच्या नेत्याचा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध
डोंबिवलीचे गणेश मंदिर संस्थान, टिळक नगर शिक्षण मंडळ अशा नामांकित संस्थांचे अध्यक्षपद आबासाहेबांनी अनेक वर्ष भूषविले. तर अनेक सामाजिक संस्थांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. आपल्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक डोंबीवलीकरांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.