केरळचे मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) वरिष्ठ नेते पिनराई विजयन यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असताना एक दावा केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सोमवारी मल्लपुरम येथे आंदोलनात बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, “भारत माता की जय आणि जय हिंद हे नारे पहिल्यांदा मुस्लीम नागरिकांनी दिले. तसेच देशाच्या इतिहासात आणि स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम शासक, सांस्कृतिक नायक आणि अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
“आपण पाहिलं की, संघ परिवाराचे नेते येऊन भाषणं करतात. यावेळी उपस्थित लोकांना ते भारत माता की जय, अशा घोषणा देण्यास सांगतात. हा नारा संघ परिवाराशी निगडित व्यक्तीने शोधला आहे का? हा नारा सर्वप्रथम ज्याने दिला, त्या व्यक्तीचे नाव आहे अझिमुल्ला खान. १९व्या शतकात मराठा पेशवे नाना साहेब यांचे ते प्रधान असल्याचा दावाही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला. मुस्लीम नागरिकाने हा नारा शोधल्यामुळे ते कदाचित उद्या हा नारा देणेच बंद करतील का? याबाबत मला तरी कल्पना नाही,” असे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले. आबिद हसन नावाच्या व्यक्तीने सर्वप्रथम ‘जय हिंद’चा नारा दिला होता, असेही ते म्हणाले.
विजयन यांच्या मते, मुघल सम्राट शाहजहानचा मुलगा दारा शिकोह याने मूळ संस्कृत ग्रंथातून ५० हून अधिक उपनिषदांचे फारसी भाषेत भाषांतर केले होते, ज्यामुळे भारतीय ग्रंथ जगभरात पसरण्यास मदत झाली. ते म्हणाले की, भारतातून मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवण्याचे समर्थन करणाऱ्या संघ परिवारातील नेते आणि कार्यकर्त्यांना या ऐतिहासिक संदर्भाची माहिती असली पाहिजे. “सारे जहँ से अच्छा…” हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी रचले. मुस्लीम शासकांनी आणि इतरांनी भारताच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच मुस्लीमामधील एका मोठ्या वर्गाने स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
ओम बिर्ला यांना टक्कर देण्यासाठी प्रल्हाद गुंजाळ मैदानात!
बंगळूरूमध्ये पाण्याचा अपव्यय करणाऱ्या २२ नागरिकांना लाखोंचा दंड
काँग्रेसच्या सहाव्या यादीतून पाच उमेदवार जाहीर
केजरीवालनी खलिस्तानी चळवळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते!
त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. २०१९ साली केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणल्यापासून काँग्रेसला देशव्यापी आंदोल उभे करता आले नाही, अशी टीका पिनराई विजयन यांनी केली. एवढेच नाही तर सीएए कायद्याची अधिसूचना काढल्यानंतरही या विषयावर भूमिका जाहीर करण्यात काँग्रेस पक्षाला अपयश आले आहे, असेही ते म्हणाले.