जे. आर. डी. टाटा यांनी १५ ऑक्टोबर १९३२ रोजी कराची ते मुंबई मार्गावर टाटा एअरलाईन्सच्या पहिल्या व्यावसायिक विमानासह उड्डाण केले होते. त्यांना भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राचे जनक मानले जाते. त्यांचे पहिले व्यावसायिक विमान पुन्हा गगनभरारी घेण्याच्या तयारीत आहे. येत्या १५ ऑक्टोबरला ते भूज ते मुंबई मार्गावर उड्डाण करणार आहे. बोरिवलीची विश्वविक्रम करणारी वैमानिक आरोही पंडित विमानाचे सारथ्य करणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘इंडियन वूमन पायलट्स असोसिएशन’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जे. आर. डी. टाटा यांना अनोखी मानवंदना देण्याचा हेतूही यामागे आहे. आरोही पंडित सारथ्य करत असलेले विमान १५ ऑक्टोबरला भुज विमानतळावरून उड्डाण करेल. ज्या ठिकाणाहून हे विमान उड्डाण करणार आहे ती जागा सुद्धा भारताच्या इतिहासातील महत्त्वाची जागा असून महिलांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारी आहे. १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धाच्या वेळी भुजच्या माधापर गावातील महिलांनी ७२ तासांमध्ये ही धावपट्टी तयार केली होती. आरोही पंडित सुद्धा याच धावपट्टीवरून उड्डाण करतील.
हे ही वाचा:
अखेर प्रियांका गांधींना केली अटक
मुंबई नाशिक प्रवास करता येणार अवघ्या दोन तासांत
आता बॉम्बे नाही, मुंबई आर्ट सोसायटी!
गांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस
टाटांनी पहिल्या उड्डाणावेळी जो मार्ग निवडला होता त्याच मार्गे आणि समतुल्य इंधन क्षमतेसह हे विमान मार्गक्रमण करेल. अहमदाबाद येथे विमानात इंधन भरून ते मुंबईच्या जुहू विमान तळाच्या दिशेने रवाना होईल. ५०० सागरी मैलांचे अंतर ५ तासांमध्ये पार केले जाईल आणि त्यासाठी ६० लिटरपेक्षाही कमी इंधन लागेल. तसेच संगणकीकृत उपकरणांचा वापर केला जाणार नाही. हे विमान पाच हजार फूट उंचीखालीच उड्डाण करेल, अशी माहिती ‘इंडियन वूमन पायलट्स असोसिएशन’ने दिली.