आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय ‘आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही निलंबनाची मुदत वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी प्रस्ताव पाठवला होता.राज्यसभेतील पाच खासदारांचा असा दावा आहे की, त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता.हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला होता. भाजपचे तीन खासदार, बीजेडी आणि एआयएडीएमकेचे एक खासदार आहेत ज्यांनी निषेध नोंदवला आहे.
या पाच खासदारांमध्ये सस्मित पात्रा, नरहरी अमीन,सुधांशू त्रिवेदी, नागालँडचे खासदार फांगनॉन कोन्याक आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे. थंबीदुराई हे AIADMK खासदार आहेत. राघव यांनी त्यांची संमती किंवा स्वाक्षरी न घेता हा प्रस्ताव पाठवला असल्याचे भाजपच्या काही खासदारांनी सांगितले.राज्यसभेच्या उपसभापतींनी याची चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
हे ही वाचा:
बांके बिहारी मंदिराच्या जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंद
रोनाल्डो ठरला इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेखीसाठी समिती
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लवकरच ईडीकडून समन्स
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत खासदार राघव चढ्ढा यांचं निलंबन कायम राहणार असल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.
संजय सिंह सुद्धा निलंबित
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संजय सिंह यांना संसदेच्या संपूर्ण पावसाळी अधिवेशनातून निलंबित केलं आहे. आता विशेषाधिकार समितीची चौकशी होईपर्यंत संजय सिंह यांनाही राज्यसभेतून निलंबित करण्यात येईल, असं राज्यसभेकडून सांगण्यात आलं आहे. राज्यसभेतील नेते पियुष गोयल यांनी संजय सिंह यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ते आवाजी मतदानानं मंजूर झालं. संजय सिंह यांना ‘अशोभनीय वर्तन’ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.
खरं तर मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या मागणीवर विरोधक ठाम होते. तेव्हा सभापती जगदीप धनखड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा केली जाईल, असं सांगितले. मात्र, प्रश्नोत्तराचा तास काही मिनिटंच चालला. यानंतर संजय सिंह सभापतींच्या खुर्चीजवळही आले. अध्यक्षांनी त्यांना परत जाण्यास सांगितलं. मात्र ते सिंह यांनी ऐकलं नाही. त्यानंतर पीयूष गोयल यांनी त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. तो मंजूर झाला होता.