पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. शहरातील ब्रेन डेड रुग्णाचे हात दान करण्याचा कौतुकास्पद निर्णय रुग्णाच्या कुटुंबीयांनी घेतला. या ब्रेन डेड व्यक्तीचा उजवा हात रुग्णाला अवयव प्रत्यारोपण करून यशस्वीपणे लावण्यात आला. तब्बल २४ तास ही अवघड शस्त्रक्रिया सुरू होती. ही धाडसी शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने यशस्वी केली. हाताचे प्रत्यारोपण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात प्रथमच झाले, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
एका २१ वर्षीय तरुणाचा उजवा हात अपघातामुळे निकामी झाला होता. त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच दुसऱ्या एका रुग्णालयातील ब्रेन डेड घोषित रुग्णाचा हात मिळणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाला मिळताच रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाने हात प्रत्यारोपणाची तयारी सुरू केली आणि या अवघड शस्त्रक्रियेनंतर या तरुणाला नवा हात मिळाला आहे. पुढील वर्षभर योग्य व्यायाम आणि औषध उपचार घेतल्यानंतर प्रत्यारोपण केलेला हात योग्यरीत्या काम करत आहे की नाही हे स्पष्ट होईल असेल डॉ. देशमुख यांनी सांगितले.
हे ही वाचा:
लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक
ठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द
हाताचे प्रत्यारोपण करण्यासाठी साधारण २४ तास लागतात. या शस्त्रक्रियेत दोन मुख्य धमन्या, सहा शिरा, आठ नसा आणि १२ टेंडन्स आणि हाडे जोडली जातात. अवयव दान करणाऱ्या तरुणाने हातासह फुफ्फुस, यकृत, किडनी, कॉर्निया आणि त्वचा हे अवयव दान केले आहेत. हात दान व हात प्रत्यारोपणाची ही पहिली यशस्वी नोंद पालिकेच्या रुग्णालयात झाली.