दिव्यांगांची सहल; शिरगाव किल्ला, केळवा बीचची केली सफर

दिव्यांगांची सहल; शिरगाव किल्ला, केळवा बीचची केली सफर

रोटरी क्लब ऑफ मुंबई, जुहू यांच्या मदतीने अपंगांसाठी ट्रेक आयोजित करणारे गिर्यारोहक संतोष संसारे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, ४ मे रोजी विविध श्रेणीतील दिव्यांगांची ऐतिहासिक सहल आयोजित करण्यात आली होती. पालघर येथील शिरगाव किल्ला, केळवा बीच, शितलादेवी मंदिर या ठिकाणी १३० दिव्यांग मित्रांची ऐतिहासिक सहल यशस्वी पार पडली.

संतोष संसारे हे २००१ पासून दिव्यांगांसाठी गिर्यारोहणाचे कार्यक्रम विविध संस्थांच्या माध्यमातून घेत आहेत. आतापर्यंत जवळजवळ २,२०० हून अधिक दिव्यांग मित्रांनी गड किल्ले त्यांच्यासोबत पाहिले आहेत. यावर्षी कार्यक्रमात दिव्यांग, अंध आणि मतिमंद असा त्रिवेणी संगम होता. मे महिन्याचा उन्हाळा असल्यामुळे डोंगरी किल्ला न घेता, समुद्राच्या जवळचा शिरगावचा किल्ला, मंदिर आणि समुद्र किनारा हा एक त्रिवेणी संगम साधला. रोटरी क्लब ऑफ मुंबई, जुहू यांच्या सहाय्याने २०१६ पासून कार्यक्रम होत आहेत.

या वेळेचा कार्यक्रम हा संतोष संसारे यांचे दिवंगत मित्र, ट्रेकर, सायकलिस्ट,रोटारियन आशिष पाटणकर त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘आशिष की उमंग’ म्हणून साजरा केला. जुहू रोटरीचे अध्यक्ष अरुण वाधवा आणि पालघर रोटरी क्लबने पाठींबा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या वर्षाचा विशेष पुरस्कार अंध गिर्यारोहक सागर बोडके याचे १०० किल्ले जानेवारी मध्ये पूर्ण झाले म्हणून त्याचा सत्कार मुग्धा आशिष पाटणकर, रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू यांच्या तर्फे करण्यात आला. नाशिकमध्ये स्थायिक असलेले सागर बोडके, ब्रावो बुक आणि वंडर बुक ऑफ लंडन पुरस्कार विजेता, सायकलिस्ट आणि स्विमर आहेत.

हे ही वाचा:

पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!

सलमान खान गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी राजस्थानमधून गजाआड

कसाबचे कौतुक करायचे असेल तर पाकिस्तानात जा!

‘लडकी हो तो पिटोगी, ही काँग्रेसची घोषणा’

कार्यक्रमात अंध,अपंग गिर्यारोहक संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सामील झाले होते. त्यातील बरेच जण नवखे होते. आमचा आत्मविश्वास वाढला आहे. अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. तुम्ही असे गिर्यारोहणाचे कार्यक्रम यापुढेही करा आणि आम्हाला बोलवा. ३० स्वयंसेवकाच्या मदतीने लहान मुलांचे आणि मतिमंद मुलांचे डान्स मिमिक्री असे कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता मोठ्या आनंदाने झाली.

Exit mobile version