अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. या अपघातातून आतापर्यंत २६ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. शोधमोहीम अद्याप सुरू आहे.
अहमदाबादमधील वेजालपूर भागातील यास्मिन सोसायटी ही इमारत धोकादायक जाहीर करण्यात आली होती. तसेच, रहिवाशांना इमारत रिकामी करण्याची नोटीसही अहमदाबाद महापालिकेने बजावली होती. मात्र पालिकेने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याला न जुमानता सुमारे २४ कुटुंबे येथे राहात होती. गुरुवारी सकाळीच इमारतीमधून काँक्रीटचे काही तुकडे पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळळ्यामुळे २३ कुटुंबांनी त्यांची घरे तातडीने रिकामी केली. इमारत कोसळत असताना आठ जण इमारतीमध्येच अडकले होते. नागरिकांनी त्यातील पाच जणांची सुटका केली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली. ‘घटनेची माहिती मिळताच, आमचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. आम्ही पोहोचेपर्यंत इमारतीतून २३ जणांची सुटका करण्यात आली होती. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर आम्ही आत अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका केली,’ अशी माहिती अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी दिली.
हे ही वाचा:
रेल्वेमध्ये अग्निवीरांसाठी १५ टक्के जागा राखीव
इम्रान खान यांच्या पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. शिरीन मजारी यांना अटक
स्पॅम कॉल्सवरून भारत सरकारने दिला व्हॉट्सअपला दिला इशारा
एलन मस्क ‘ट्विटर’च्या सीईओपदाचा राजीनामा देणार
रुकैया शेख (६५), तहेराबानू शेख (३५) आणि अख्तर शेख (२६) हे तिघे राडारोड्याखाली अडकले होते. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. तर, अहमदाबाद पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हात झटकले आहेत. ‘कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलली होती. मात्र रहिवाशांनी आमच्या आदेशाला जुमानले नाही,’ असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.