देशात विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळण्याचे सत्र सुरू आहे. अनेकदा विमानांना उड्डाण करण्यापूर्वी अथवा उड्डाण केल्यानंतर लगेचच या धमक्या प्राप्त होतात. यामुळे अनेकदा विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागते आणि पुढे सर्व सुरक्षा नियम पाळून तपासणी केली जाते. यात प्रवाशांचा, विमान कंपन्यांचा वेळ आणि पैसा दोन्हींचे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. तपसाअंती या धमक्या बनावट असल्याचे निष्पन्न होत आहे. मात्र, यात विमान कंपन्यांना एका धमकीच्या मागे करोडो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या बोईंग ७७७ विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कसाठी निघाले होते. न्यूयॉर्कमधील केन्नेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरणार होते. विमानाने मुंबईहून उड्डाण करताच काही वेळातच विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली यानंतर विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी मुंबईहून उड्डाण घेतलेल्या या विमानात सुमारे १३० टन जेट इंधन भरले होते. हे विमान १६ तास न थांबता प्रवास करणार होते. टेकऑफ झाल्यानंतर लगेचचं विमान कंपनीला विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला. कॉल मिळाल्यानंतर, न्यूयॉर्कला जाणारे हे विमान तातडीने दिल्लीकडे वळवण्यात आले आणि टेक ऑफच्या दोन तासांच्या आत दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, तपासादरम्यान विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही आणि कॉल बनावट असल्याचे सिद्ध झाले. या फेक कॉलमुळे विमान कंपनीचे मात्र करोडोंचे नुकसान झाले.
एका वरिष्ठ पायलटने सांगितले की, बोईंग ७७७ चे कमाल लँडिंग वजन सुमारे अडीचशेटन आहे. परंतु, उड्डाणाच्या वेळी प्रवासी, त्यांचे सामान आणि मालासह त्याचे वजन अंदाजे ३४०- ३५० टन इतके होते. दोन तासांत विमान लँड करणे म्हणजे सुमारे १०० टन इंधन टाकणे. जेणेकरून त्याचे वजन लँडिंगच्या वजनाइतके असेल. एक टन इंधनासाठी सुमारे एक लाख रुपये मोजलेले असतात म्हणजेचं १०० टन इंधनाची किंमत एक कोटीच्या आसपास जाते.
हे ही वाचा..
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यातील गावात बॉम्बस्फोट
इस्रायल पंतप्रधान नेतन्याहू यांच्या खासगी निवासस्थानाजवळ ड्रोनचा स्फोट
शुटरच्या फोनमध्ये झीशान सिद्दीकीचा फोटो सापडला
…म्हणून केले सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन
इमर्जन्सी लँडिंगमुळे इतर खर्चही विमान कंपनीच्या खात्यावरचं येतो. जसे की, विमानतळावर आपत्कालीन लँडिंग आणि विमान पार्किंग शुल्क, हॉटेल्समध्ये प्रवासी आणि क्रू यांना ठेवण्याचा खर्च, कोणा प्रवाशांची पुढे कनेक्टिंग फ्लाइट असल्यास त्यांना नुकसान भरपाई देणे, प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करणे असे अनेक खर्च कंपनीला करावे लागतात. त्यामुळे एका धमकीच्या संदेशामुळे विमान कंपनीला साधारण तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. गेल्या काही दिवसांत, भारतीय विमान कंपन्यांना वारंवार धमकीचे संदेश मिळत आहेत. परंतु, नंतर हे सर्व खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, या खोट्या धमक्यांमुळे सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च विमान कंपन्यांना झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय बॉम्बच्या खोट्या धमकीच्या घटना रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याचा विचार करत आहे.