केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या आयुष्याचा उलगडा लवकरच रुपेरी पडद्यावर होणार आहे. ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून अक्षय अनंत देशमुख निर्मित, अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे सहनिर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांचे आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ही उत्सुकता टीझरमध्येही कायम राहिली आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोणाला पाहायला मिळाणार आहे हे प्रश्न सध्या अनुत्तरीत असून यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. टीझरची सुरुवातच “या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…” या ओळीने होतेय. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना २७ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.
दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणतात, “नितीन गडकरी हे राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पोस्टर प्रदर्शनानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी मला नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार असल्याचे विचारले. मात्र ही उत्सुकता लवकरच दूर होईल. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, समाजसेवक ते प्रमुख कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. त्यांचे हे दुसरं जग जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. खासगी आयुष्यात नितीन गडकरी कसे होते आणि कसे आहेत, हे ‘गडकरी’मधून प्रेक्षकांना जाणून घेता येईल.”
हे ही वाचा:
अबब! अबू आजमींचे ४५ फ्लॅट, वाराणसीच्या टॉवरमध्ये पाच मजले जप्त
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; तारखा जाहीर
भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय
या चित्रपटाच्या निर्मितीची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. दरम्यान, करोना काळात चित्रपटाचे काम थांबले होते. या चित्रपटासाठी नितीन गडकरी यांच्याविषयी सगळी माहिती ही त्यांचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून घेण्यात आली आहे. राजकीय मुद्दा चित्रपटात न मांडता तरुणांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रेरणा मिळावी यादृष्टीने सिनेमा बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.